कोकणातील दहा लाख विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी समाज जोडो आंदोलन

Google search engine
Google search engine
समाजासाठी साडेपाच वर्षे देशाचा प्रवास करणाऱ्या संजय मारुती कदम यांचे प्रतिपादन
कोकणातील विमुक्त जाती भटक्या जमातीला त्यांचा हक्क न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

रत्नागिरी | प्रतिनिधी : कधी नदीनाल्या किनारी तर कधी झोपडीवर, कधी पालावर जन्म झालेल्या राज्यासह देशभरातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज एकत्र जोडून त्यांच्या हक्कासाठी गेली साडेपाच वर्षे 22 राज्यातून 1 लाख 35 हजार किलोमीटरचा  मोटरसायकलने प्रवास करत 2 करोड भटक्या विमुक्तांना जोडत जोडत त्यांचे प्रश्न मांडणारे संजय कदम हे गुरुवारी रत्नागिरीत दाखल झाले होते.  कोकणासह रत्नागिरी जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली.

विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाची माहिती संजय कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. संजय मारुती कदम यांनी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी संन्यास घेतला असून  7 जून 2017 ला पुणे येथून विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाची त्यांनी सुरुवात केली आहे. हे अभियान भारत देशातील 22 राज्यातून 1 लाख 35 हजार किलोमीटरचा मोटरसायकल चालवून 2 करोड भटक्या विमुक्तांना जोडत जोडत त्यांचे प्रश्न सोडवत त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती व्यसनमुक्तीचा संदेश एकता प्रबोधन सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय हक्क व संविधानिक मागण्या घेऊन रत्नागिरी येथे पोहोचले आहे असे ते म्हणाले.

विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानांतर्गत संजय मारुती कदम यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांची भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी गृह चौकशी अहवाल बनवून जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजासाठी कॅम्प राबवून जातीचे दाखले देण्यात यावे, तांडा वस्ती सुधार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शबरीमाला योजना, सीडस योजना अंतर्गत जिल्ह्यातील विमुक्त जाती भटक्या जमातींना घरे मिळावे, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त महामंडळावर कुणीच नाही महामंडळावर भटक्या विमुक्त समाजातील डायरेक्टर नेमुन महामंडळा अंतर्गत त्वरित भटक्या मुक्तांना लोन देण्यात यावे, महाज्योतीचं सेंटर कोकणामध्ये उभे करावे अशा मागण्या केल्या आहेत.

संजय कदम म्हणाले कि, भटक्या मुक्तांचा जन्म कधी नदीनाल्या किनारी तर कधी झोपडीवर, कधी पालावर झाला आहे. त्यामुळे आमचे जन्माचे पुरावे नाहीत तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला कुठून येणार.  जातीचा दाखला नाही तर योजना आरक्षण नोकऱ्या कशा भेटणार. त्यामुळे भारत देशातील 30 करोड भटक्या विमुक्त समाज आजही लँडलेस आणि होमलेस आहे. भटक्या मुक्त समाजाकडे राहायला घर नाही, मरायला समशानभूमी नाही, जगायचं तर कसं जगायचं? त्यामुळे विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान भटक्या मुक्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुरु केले, ह्या अभियाना अंतर्गत 2 करोड भटक्या विमुक्तांची चळवळ उभी राहिली, या अभियानांतर्गत भारत देशातील सगळ्या भटक्या मुक्त समाजाला जोडले सर्व भटक्या मुक्तांची एकच मागणी आहे राष्ट्रीय स्तरावर डीएनटी कॅटेगिरी झालीच पाहिजे, केंद्र सरकारने प्रत्येक राज्य सरकारला भटक्या मुक्तांचा सर्वे करून तो सर्व डाटा केंद्राकडे पाठवावा. त्यासाठी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी भटक्यामुक्तांचा सर्वे करून केंद्राकडे सर्वे प्रस्ताव पाठवावा, भटक्या मुक्तांना राजकीय आरक्षण मिळावे, अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा मिळावा असेही ते म्हणाले.

रत्नागिरी जिल्ह्यातील गोंधळी, जोशी, सरोदे, सरोदि, भोरपी, गोपाळ, नाथपंथी डवरी गोसावी, धनगर, वंजारी, लोहार, बंजारा, बेलदार इत्यादी समाजाची संजय कदम भेट घेऊन समाजामध्ये जागृती एकता प्रबोधन केले.  अखेरच्या श्वासापर्यंत पूर्ण जीवन भटक्या मुक्तांसाठी देणार व भटक्या विमुक्तांसाठीच असेल असे सांगताना लवकरच दिल्ली येथे दहा लाख भटके मुक्त आंदोलन करणार आहेत तर येत्या पंधरा दिवसांमध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाला कॅम्प राबवून विनाअट जातीचे दाखले नाही दिले तर प्रत्येक जिल्ह्याधिकारी कार्यालयावर विमुक्त जाती भटक्या जमाती समाज क्रांती मोर्चा कोकणामध्ये निघेल असेही त्यांनी सांगितले.