सावंतवाडीत पार्किंग केलेल्या गाडीतील पेट्रोल चोरीचे प्रकार 

 

चोरटे सिसीटीव्हीत कैद । पोलीसांकडून तपास

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात घरफोडी व मूर्त्यां चोरीचे प्रमाण वाढलेले असतानाच आता पेट्रोल चोरीचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. एका इमारतीलगत काही युवक पेट्रोल चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून त्या युवकांचा शोध पोलीस घेत आहेत. यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त असून पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे.

सावंतवाडी शहरात पेट्रोल चोरी तसेच गाड्यांच्या बॅटरी चोरीचे प्रकार वाढले असून याबाबत काही नागरिकांनी पोलीसांना कल्पना ही दिली आहे. मात्र, अद्याप पर्यंत कोणतीही लेखी तक्रार दिलेली नाही. अनेक संकुलांच्या पार्किंग मध्ये लावलेल्या गाड्यांमधील पेट्रोलची चोरी करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे.

तसेच शहरातील सालईवाडा येथील एका इमारतीच्या पार्किंग मध्ये लावण्यात आलेल्या दुचाकी मधून काही युवक पेट्रोलची चोरी करताना सीसीटीव्हीत कैद झाले असून हे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांना देण्यात आले आहे. या फुटेज वरून चोरी करणारी टोळी असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले असून या युवकांनी अनेक इमारतीच्या पार्किंग मधील दुचाकीचे पेट्रोल चोरल्याचे पुढे आले आहे. त्या दृष्टीने पोलीसांनी तपास सुरू केला आहे.