मंडणगड : प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठ संचलित, विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात बीएमएस विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात ” वित्तीय क्षेत्रातील संधी व उच्चशिक्षण” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस शोएब हसवारे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला बीएमएस विभागातर्फे सहा. प्रा. मेटकरी सर यांनी कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक शोएब हसवारे यांचे स्वागत केले आणि सहा. प्रा. अमोल राजेशिर्के सर यांनी कार्यशाळेची प्रस्तावना करत कार्यशाळेचे उद्धेश स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना शोएब हसवारे म्हणाले की, “देशात सध्या हजारो नॉन बँकिंग फायनान्सिअल कंपन्या आहेत. त्यासोबतच 26 राष्ट्रीयीकृत बँका, २१ प्रमुख खाजगी बँका, ५७ इन्सुरन्स कंपन्या तसेच एमएनसी, सार्वजनिक आणि खाजगी कंपन्या यांची देखील संख्या खूप मोठी आहे. या सर्व ठिकाणी वित्तीय क्षेत्रातील करियर साठी असंख्य संधी उपलब्ध आहेत. बीएमएस अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर लगेचच याठिकाणी आपणास नोकरीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर आपण पुढे उच्च शिक्षण देखील घेवू शकता ज्यामध्ये एमबीए, सीए, सीएस, आयसीडब्लूए, सीएफए इत्यादी पूर्णता वित्तीय क्षेत्रातील करियर साठी उपलब्ध पर्याय आहेत”. पुढे ते वित्तीय क्षेत्रात करियर साठी युएई मध्ये सध्या होणारे बदल आणि भविष्यात निर्माण होणाऱ्या संधीबाबतही मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात प्रश्नोत्तरामध्ये अक्सा पेटकर, धनंजय पानवलकर, आफरीन मुजावर या विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांचे समाधान झाल्यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थीनी शीतल पाटील हिने कार्यशाळेस उपस्थित सर्वांचे आभार मानले. कार्यशाळेस सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर दोन दिवशीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरीसरचे प्र. संचालक डॉ. किशोर सुखटनकर आणि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.