मुंबई : आपल्या बेताल वाक्त्व्यांसाठी सातत्याने टीकेचे लक्ष्य होणारे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत सतत वाढच होताना दिसतेय. खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले आहेतच. पण राऊत यांचे मार्गदर्शक असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबईत महाविकास आघाडीच्या डिनर डिप्लोमसीमध्ये संजय राऊतांच्या विधीमंडळासंदर्भातल्या वक्तव्यावर चर्चा झाली. शरद पवार यांनी देखील संजय राऊतांच्या विधानावर काहीअंशी नाराजी व्यक्त केली. संजय राऊत यांच्या विधानाशी मी पूर्ण सहमत नाही, पण त्यावर हक्कभंगाची जी समिती नेमली ती न्यायाला धरून नाही. ज्यांनी आरोप केले तेच या समितीत असतील तर न्याय कसा होईल, अशी भूमिका शरद पवारांनी व्यक्त केली.
सर्वपक्षीय नेत्यांनी समाचार घेतल्यानंतर संजय राऊतांची भाषा नरमली आहे. संसद आणि विधिमंडळाचा नेहमीच आदर केल्याची सारवासारव संजय राऊतांनी केली. कोल्हापूरमध्ये विरोधकांचा समाचार घेताना संजय राऊतांची जीभ घसरली. आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ही पदं आम्हाला दिली आहेत, याची आठवण करून देताना त्यांनी विधीमंडळाचा अवमान केला.