सावंतवाडीचा आठवडा बाजार मोती तलावकाठीच हवा

Google search engine
Google search engine

फिरत्या विक्रेत्यांची मागणी : १०१ सह्यांचं निवेदन

सावंतवाडी । प्रतिनिधी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आठवडा बाजार मोती तलावा काठावरून हलविणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता आठवडा बाजारावरून दोन गट पडलेले दिसत आहेत. स्थानिक भाजी विक्रेत्यांनी दोन दिवसांपूर्वी आठवडा बाजार अन्यत्र हलवावा अशी मागणी केली होती. त्यानंतर शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून फिरत्या विक्रेत्यांनी संघटीत होत नगरपरिषदेवर धडक दिली. हा आठवडा बाजार आहे तिथेच असावा अशी या फिरत्या विक्रेत्यांची प्रमुख मागणी केली. मात्र, मुख्याधिकारी रजेवर असल्याने त्यांची भेट झाली नसली तरीही सोमवारी भेट देणार असल्याच आश्वासन त्यांनी दिल्याच फेडरेशनतर्फे सांगण्यात आलं.
दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक विरुद्ध फिरते व्यापारी ‘आमने-सामने’आले आहेत. तर जागा निश्चित करताना फिरत्या विक्रेत्यांचा व्यापार होईल अशीच जागा निश्चित करावी. मंत्री केसरकर यांना आमदारकीला आम्ही देखील मतदान केलं आहे. त्यामुळे फिरत्या विक्रेत्यांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावेत. व्यापाऱ्यांत भांडण लावून आपली राजकीय पोळी कुणी भाजू नये असा इशारा हॉकर्स फेडरेशनचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर यांनी देत फिरत्या विक्रेत्यांच्या १०१ सह्यांच पत्र न.प.च्या अधिकारी आसावरी शिरोडकर यांच्याकडे सुपूर्द केलं.

सावंतवाडी शहरात मंगळवारच्या आठवडा बाजार व अन्य दिवशी सावंतवाडी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात सावंतवाडी नगरपालिकेने वेळोवेळी केलेले नियम व निर्देशांचे पालन करीत व्यवसाय करीत असतो. अलिकडेच मोती तलावाकाठी भरविला जाणारा आठवडा बाजार होळीचा खुंट जूना बाजार येथे हलविला जाईल, असे वक्तव्य मंत्री दीपक केसरकर यांनी केले होते.त्याबाबत आमची हरकत नोंदवित आहोत. सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील आठवडा बाजाराची जागा आम्हा फेरीवाल्यांना विश्वासात न घेता नगरपालिकेने वेळोवेळी बदललेली आहे. आठवडा बाजाराची जागा बदलताना याबाबत आम्हा फेरीवाल्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. तसेच आठवडा बाजाराची जागा निश्चित करताना आठवडा बाजारासाठी येणाऱ्या ग्राहकांची सोय, त्यांना रिक्षा, बस आदी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था त्याठिकाणी आहे अथवा कसे याचा विचार करून जागा निश्चित करण्यात यावी. आठवडा बाजाराची जागा निश्चित करताना त्याबाजारास येण्याचा व्यापाऱ्यांचा व्यवसाय होईल अशा स्वरूपाची जागा उपलब्ध करून देण्यात यावी.

सध्यस्थितीत श्रीराम वाचन मंदीर ते शिवरामराजे भोसले यादरम्यानेअसलेल्या बाजाराची जागा फेरीवाले ग्राहक यांना सोयीची असल्याने ही जागा बदलण्यात येवू नये. होळीचा खुंट येथील आठवडा बाजाराची जागा ही गैरसोयीची आहे. त्याठिकाणी सर्व व्यापान्यांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी आठवडा बाजार हलविण्यात येवू नये.नगरपालिका हद्दीत हॉकर्स झोन जाहीर करताना जी समिती निश्चित करण्यात आलेली आहे त्या समितीमध्ये आम्हा फेरीवाल्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही. तरी यापुढे फेरीवाल्यांच्याबाबत कोणतेही धोरण निश्चित करण्यापूर्वी आम्हा फेरीवाल्यांना विश्वासात घेण्यात यावे. आम्हा फेरीवाल्यांना बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी. तर अलिकडेच व्यापारी महासंघाने संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी आठवडा बाजार भरवावा अशी मागणी केलेली आहे.

या मागणीस आमची सक्त हरकत आहे. फेरीवाले व्यापारी आठवडयाचे सातही दिवस वेगवेगळया गावात जावून आपला व्यवसाय करतात. आठवडयातून एकच दिवस आठवडा बाजार झाल्यास त्यांचेवर उपासमारीची वेळ येणारी आहे. फेरीवाले हे बहुतांशी सावंतवाडी नगरपालिका हद्दीत वास्तव्य करतो. आम्ही सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील मतदार आहोत. तरी सावंतवाडी नगरपालिका हद्दीतील रहिवासी व मतदार या नात्याने आपण आमच्या हिताचे रक्षण करावे व आमचेवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असं १०१ सह्यांच निवेदन महाराष्ट्र स्टेट हॉकर्स फेडरेशनच्या माध्यमातून प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना देण्यात आल आहे.
सावंतवाडी नगरपरिषदेवर ”हम सब एक है” चा नारा देत हे निवेदन देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा हॉकर्स फेडरेशन जिल्हाध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, महेश परूळेकर, नाजिम पटेल, राजेंद्र लेंडगे, संदीप गौंड, इरसाद मालदार, सुमन वाडीकर, सुभाष चव्हाण आदी फिरते व्यापारी उपस्थित होते.