राजापुरात शिवसेनेचा उ. बा. ठाकरे गटाला दणका

राजापुरातील पडवे गावातील गावकर दत्ताराम ठुकरूल, सरपंच रूची बाणे यांसह त्यांच्या सहकाऱ्यांचे शिवसेनेत स्वागत करताना किरण सामंत, राहुल पंडीत, अशफाक हाजू व अन्य.
जि. प. माजी बांधकाम सभापती अजित नारकर, पडवे गावप्रमुख व सरपंचांसह अनेकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यात उ. बा. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडून शिंदेच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. शुक्रवारी तालुक्यातील सागवे जिल्हा परिषद गटाचे माजी जि. प. सदस्य व जि. प. चे माजी बांधकाम सभापती अजित नारकर, पडवे गावचे गावप्रमुख दत्ताराम बाबू ठुकरूल व गावच्या सरपंच सौ. रुची विलास बाणे यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. राजापुर तालुका कुणबी पतपेढीचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबे यांनी देखील शिवसेनेचा झेंडा हाती घेतला आहे.

शिवसेनेचे राजापूर तालुका प्रमुख अशफाक हाजू यांच्या नेतृत्वाखाली या सगळयांनी शिवसेनेत प्रवेश केला. तशी माहिती हाजू यांनी पत्रकारांना दिली आहे. या सर्वांना रत्नागिरी येथे पक्षाच्या कार्यालयात प्रवेश केल्याचे हाजू यांनी सांगितले.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राहुल पंडीत व उद्योजक आणि शिवसेनेचे रत्नागिरीतील नेते किरण सामंत यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. नारकर, तांबे यांसह पडवे गावातील ग्रामस्थांच्या प्रवेशामुळे या विभागात उ. बा‘ ठाकरे गटाला चांगलाच दणका बसला आहे.

राजापुरात गेले काही दिवस उ. बा. ठाकरे गटाला गळती लागली आहे. अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष सोडत आहेत. यापुर्वी अणसुरेचे माजी पंचायत समिती सदस्य प्रशांत गावकर यांच्यासह शेकडो जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता तर सागवे जिल्हा परिषद गटाचे माजी जि. प. सदस्य व जि. प. चे माजी बांधकाम सभापती अजित नारकर यांनीही उ. बा. ठाकरे गटाला रामराम केला आहे. नारकर हे एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. जि. प. सदस्य आणि बांधकाम सभापती म्हणून त्यांनी अत्यंत चांगली कामगिरी केली होती. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे उ. बा. ठाकरे गटाला या विभागात दणका बसला आहे. तर पडवे गावतील गावकर, सरपंचांसह ग्रामस्थांनीही उ. बा. ठाकरे गटाचा त्याग करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये अजित जयवंत नारकर, आनंद मधुसुदन बापट, अमित यशवंत दिक्षित, ग्रामपंचायत सदस्या कु. स्वाती गणपत तांबे यशवंत सोनु तांबे, जगन्नाथ विष्णु तांबे, श्रीराम मधुकर मेस्त्री, बाळकृष्ण सखाराम तांबे, स्वप्नील गणपत तांबे, ओंकार लक्ष्मीकांत अवसरे यांचा समावेश आहे.

या सर्व प्रवेश कर्त्यांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल व भविष्यात पडवे गावच्या विकासासाठी आवश्यक तो निधी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या माध्यमातुन मिळवून दिला जाईल असेही हाजू यांनी यावेळी सांगितले.