आंजणारी घाटात ब्रेक फेल झाल्याने पलटी झालेल्या ट्रकखाली मालक सापडला आणि…

लांजा | प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी येथे पहाटे ब्रेक फेल झाल्याने ट्रक मुंबई गोवा महामार्गालगत पलटी झाला. शुक्रवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या दरम्याने झालेल्या या अपघातात ट्रकच्या पाठीमागे प्लायवर झोपलेला मालक हा ट्रक खाली अडकून पडला होता. लांजा पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर व जेसीबीच्या सहाय्याने ट्रक व प्लाय बाजूला करून जखमी झालेल्या मालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी पाली येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार राजेशभाई भिकाबाई सोळंकी (राहणार गुजरात )हे आपल्या ताब्यातील ट्रक (क्रमांक जीजे 23 ए -टी 64 31) या ट्रक मधून प्लाय घेऊन अहमदाबाद ते गोवा असे चालले होते .शुक्रवारी पहाटे हा ट्रक राजेश भाई सोळंकी यांचा मुलगा चालवत होता. तर दमलेले राजेश भाई सोळंकी हे ट्रक मध्ये पाठीमागे प्लायवर जावून झोपले होते.पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी घाटातील तीव्र उतारावर ट्रकचे ब्रेक फेल झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर चालकाने प्रसंगावधान राखून महामार्गा लगत असणाऱ्या मातीच्या भरावावर गाडी थांबवण्यासाठी ट्रक चढवला. त्यामुळे तो त्याच ठिकाणी पलटी झाला या अपघातामुळे ट्रकच्या पाठीमागे प्लायवर झोपलेले मालक राजेश भाई सोळंकी हे ट्रकखाली खाली अडकून पडला होते. तर अंगावर फ्लाय पडले होते. त्यामुळे त्यांना जागचे हलता येत नव्हते.

याबाबतची माहिती लांजा पोलिसांना मिळाल्यानंतर लांजा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव तसेच काॅन्स्टेबल वळवी हे सव्वा सहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ट्रक खाली अडकून पडलेल्या राजेश भाई सोळंके यांना बाहेर काढण्यासाठी या दोघांनी शर्तीचे प्रयत्न केले. ट्रक मध्ये मोठ्या प्रमाणात फ्लाय असल्याने मालक राजेश भाई सोळंके यांना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यानंतर येथील जेसीबी मागवण्यात आला . तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अडकून पडलेल्या मालक सोळंकी यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना पाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस जाधव आणि वळवी यांच्या प्रयत्नामुळेच राजेश भाई सोळंकी यांचे प्राण वाचले आहेत. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची याकामी मदत केली.

या अपघाता दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ही काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलीस देखील या ठिकाणी दाखल झाले .तसेच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे हे देखील घटना जाऊन त्यांनी घटनेची पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेला कामामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी मागणी प्रवासी वर्ग आणि ग्रामस्थांतून केले जात आहे.