जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील अणसुरे दांडे येथील पूल दुरुस्ती कामासाठी बंद करण्यात आला असून जवळपास चार ते पाच महिने हा फुल आता वाहतुकीस बंद राहणार आहे. अणसुरे आणि सागवे या दोन गावांना जोडणारा हा पूल रत्नागिरीहून सिंधुदुर्ग ला जाण्यासाठी महत्त्वाचा पूल आहे. या पुलामुळे जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर कमी होत होते . राजापूर तालुक्यातील दांडे अणसुरे बाजूकडील पुलाचा काही भाग खचल्यामुळे तो धोकादायक होता.
हा पूल लवकरात लवकर दुरुस्त व्हावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील होते या कामाला शासनाकडून मंजुरी आणि निधी प्राप्त झाल्यानंतर या पुलाच्या दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यातच या कामाला सुरुवात होणार होती मात्र बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने काही काळ हे काम पुढे ढकलण्यात आले होते. बारावीनंतर दहावीच्या परीक्षेसाठी ही या पुलाचे काम काही दिवस स्थगित ठेवावे अशी काही लोकांचे मागणी होती मात्र अजून काम पुढे ढकलणे शक्य नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून जर कामाला अजून विलंब झाल्यास पुढे पावसाळ्यात ही मोठ्या प्रमाणावर अडचणीला सामना करावा लागू शकतो त्यामुळे आज या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून ठेकेदार आणि राजापूर बांधकाम विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते . आता रत्नागिरीहून सिंधुदुर्ग कडे जायचे असल्यास जैतापूरच्या पुढे आल्यानंतर चिरेखन फाट्यावरून सरळ डोंगर तिठा मार्गे सागवे ला जाता येईल आणि तिथून पुढे आंबेरी पुलावरून सिंधुदुर्ग मध्ये जाता येईल तर सिंधुदुर्ग वरून येताना कत्रादेवी वाडी येथे आल्यावर डावीकडे दांडे बाजूला न वळता उजव्या बाजूकडे डोंगर तीठा मार्गे राजापूर किंवा जैतापूर मार्गे रत्नागिरीला जाता येईल.
हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे पावसाळ्यापर्यंत जवळपास साडेतीन महिने अवधी कामासाठी मिळणार असून पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करून पूल आणि रस्ता पुन्हा वाहतुकीस सुरू करण्याचा प्रयत्न असणार आहे ग्रामस्थांना आणि वाहन चालकांना काही महिने त्रास सहन करावा लागणार असून सर्वांकडून सहकार्य व्हावे अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.