प्रथमच एका वर्षी तीन महिलांचा समावेश
रत्नागिरी | प्रतिनिधी : गेली १० वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती व विशेष कार्य करणाऱ्या संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने आपले, सन २०२२ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र आणि रुपये ३,००० असे आहे. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ५ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी ३ महिलांना सन्मानित करण्यात येत आहे
रत्नागिरी येथे सुमारे ४ दशके अग्निहोत्र विषयक कार्य करणाऱ्या आणि कर्मयोगिनी अशी ओळख असलेल्या श्रीमती विद्या मधुकर पटवर्धन आणि व्यसनमुक्त गाव तुरळ (संगमेश्वर) येथील सामजिक कार्यकर्ते श्री . कृष्णा गुणाजी हरेकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.सिंधुदुर्गातील शिरोडा (तालुका वेंगुर्ला) येथील माऊली कर्णबधीर निवासी विद्यालयातील कलाशिक्षक श्री. बाळासाहेब आबाजी पाटील, मरीन सिंडीकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका व ३ बंदरात थेट जहाजावर जाऊन काम करणाऱ्या पहिल्या महिला अशा रत्नागिरी शहरातील अष्टपैलू सौ. संज्योक्ती संजय सुर्वे , भिंगरोली (तालुका मंडणगड ) सारख्या ग्रामीण भागातून सलग ५ वर्षे रुपये १ कोटीपेक्षा जास्त अल्पबचत गोळा करणाऱ्या सौ. निलम माधव जोशी आणि पाणथळ व पडीक जमिनीत उन्हाळी शेतीचा यशस्वी प्रयोग गेली २१ वर्षे करणारे चिंचघर – प्रभूवाडी (तालुका खेड) येथील श्री. संजय सखाराम पायरे यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त ६ व्यक्तींपैकी पैकी रत्नागिरी शहराबाहेरील ३ सन्मानिताना पुरस्काराची रक्कम बँक ट्रान्स्फरच्या माध्यमातून दिली जाणार आहे व रत्नागिरी शहराबाहेरील ४ सन्मानितानाची सन्मानपत्रे रजिस्टर पोस्टाने पाठवली जाणार आहेत.रत्नागिरी शहरातील निवासी श्रीमती विद्या मधुकर पटवर्धन आणि सौ. संज्योक्ती संजय सुर्वे यांचा गौरव, महिलादिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२३ रोजी करण्यात येणार आहे असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.