समृद्धी महामार्गावर केमिकल टँकर पुलावरून कोसळला…

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर 2 भीषण अपघात झाले आहे. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून कोसळला आहे. या अपघातात ट्रकमधील सर्व जणांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूरजवळ पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फतियाबाद परिसरातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. केमिकलने भरलेला ट्रक पुलावरून खाली कोसळला. ट्रक कोसळल्यानंतर ट्रकला भीषण आग लागली आहे. या आगीत केमिकलचा ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. ट्रकमधील ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ट्रकमध्ये किती जण होते, याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

केमिकल ट्रक असल्यामुळे आग विझवण्यात अग्निशमन दलाला अपयश आले. त्यामुळे ट्रक अपघातात नेमका किती जणांचा मृत्यू झाला याचा आकडा अस्पष्ट झाला नाही.

तर नागपूरजवळ एका पिकअप व्हॅनला अपघात झाला आहे. सोलापूर येथून द्राक्षे भरून गोंदियाला जाणारी पिकअप व्हॅन आज पहाटे पाच वाजता समृद्धी महामार्गावरून खाली उतरताना झिरो पॉईंट गार्डनमध्ये घुसली. त्यात गाडीत बसलेल्या गाडी मालकाला इजा झाली तर चालकाला सुद्धा किरकोळ जखमा झाल्या. माणिक रोडगे असे जखमी गाडीमालकाचे नाव आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.