विलवडेचे सुपुत्र सुभाष दळवी यांची स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती

सावंतवाडी । प्रतिनिधी : विलवडे गावचे सुपुत्र तथा बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी व स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख सुभाष दळवी यांची महाराष्ट्र राज्याच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज देशभरातील विविध धार्मिक स्थळी दिसणाऱ्या निर्माल्य कलशांचे ते जनक असुन कचरा व्यवस्थापनाच्या ‘दळवी पॅटर्न’ चेही तेच संकल्पक आहेत. तसेच धारावीसारख्या आव्हानात्मक परिसरात त्यांनी स्वच्छता अभियान शक्य करून दाखवले. त्यांच्या या स्वच्छता व पर्यावरण संतुलन कार्याची दखल घेऊन त्यांची या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल सुभाष दळवी यांनी सर्व संबंधित वरीष्ठांचे आभार मानत आपल्यावर विश्वास टाकल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तसेच स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान आणि बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात राबविण्यात आलेल्या स्वच्छता विषयक विविध उपक्रमांना सहकार्य केले त्या सर्वांचेही श्री. दळवी यांनी आभार मानले आहे. तसेच राज्यातील सर्व शहरांमध्ये यापुढे स्वच्छतेचे नवनवीन पॅटर्न राबविण्याचा मनोदय सुभाष दळवी यांनी व्यक्त केला.लोकसहभागातून ‘धारावी स्वच्छतेचे मॉडेल’ आज़ सर्वांनाच परिचित आहे. त्याचबरोबर जलप्रदूषण रोखण्यासाठीचे निर्माल्य कलश, निर्माल्य व्यवस्थापन, होम कंपोस्ट, कचरा वर्गीकरण, वस्ती पातळीवर कचरा व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापनासाठी ‘स्मार्ट कंपोस्ट सिस्टीम अँड ऑरगॅनिक फार्मिंग’, प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधातील अभियान, मुंबई शहरातील झोपडपट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी दत्तक वस्ती योजना यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण योजनांची संकल्पना सुभाष दळवी यांचीच आहे. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून या संकल्पना प्रत्यक्षात आल्या होत्या.

मुंबई स्वच्छ आणि सुंदर रहावी यासाठी सुभाष दळवी यांच्या अविश्रांत मेहनतीचे अनेक मुख्यमंत्री, मंत्र्यांसह कित्येकजण साक्षीदार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील समुद्रकिनारे, झोपडपट्ट्या आणि रेल्वे ट्रॅक जवळचा परिसर या ठिकाणी पहाटे ४ पासून चीरपरिचित शिट्टी घेऊन लोकांना सार्वजनिक शौचालयांचा वापर करण्यास प्रेरित करणारे सुभाष दळवी अनेकांनी अनुभवले आहेत‌. त्यामुळेच दळवी यांच्याकडे राज्याच्या स्वच्छता विभागाची सूत्रे देण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती जिल्हावासियांसाठी अभिनंदनीय आहे.स्वच्छता व पर्यावरण संतुलनातील त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे ते मानकरी ठरले आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून स्थापत्य अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी आणि डॉक्टर ऑफ लिटरेचर यासारख्या सन्माननीय पदव्यांनीही त्यांना गौरविण्यात आले आहे.‌ त्यांचे हे योगदान लक्षात घेऊनच त्यांची या महत्वाच्या पदावर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या अंमलबजावणीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून या प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माहिती, शिक्षण, प्रचार व प्रसिद्धी तसेच क्षमता बांधणीच्या प्रभावी नियंत्रणाकरीता व अंमलबजावणीसाठी त्यांची या प्रकल्पाच्या राज्य समन्वय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुभाष दळवी हे सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांचे भाऊ असुन या नियुक्तीबद्दल सुभाष दळवी यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे