दापोली | प्रतिनिधी: जेसिआय दापोली यांच्या वतीने अबोली सप्ताह निमित्त आयोजित पाककला स्पर्धेला दापोलीतील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला, या स्पर्धेमध्ये तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थ अशी संकल्पना देण्यात आली होती. यामध्ये स्पर्धकांनी सहभाग नोंदवताना विविध प्रकारचे पौष्टिकपदार्थ या स्पर्धेसाठी प्रदर्शित केलेले होते. या जेसी आशिष अमृते व मीनल लिमये यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले, या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सौ. झीनत खामसे यांच्या ज्वारी खीर मूस, द्वितीय क्रमांक सौ. गिरिजा भाटकर यांच्या चटपटी कोथ्यु रोटी, तर तृतीय क्रमांक सौ. वैष्णवी कदम यांच्या ज्वारी संत्रा केक या पदार्थांना देण्यात आले.
या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका सौ. साधना बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. जेसीआय दापोलीने आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेचे आणि अबोली सप्ताहाचे त्यांनी विशेष कौतुक केले. स्त्री सक्षमकरणासाठी असे विविध उपक्रम समाजामध्ये राबवले जात आहेत, महिलावर्ग, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये यासारख्या आस्थापना नेहमीच असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतात, यामुळे स्त्रियांना वेगळी ताकद मिळते आहे. जेसीआय दापोलीने आयोजित केलेल्या या अबोली सप्ताहाचे सौ बोत्रे यांनी कौतुक केले. या अबोली सप्ताहामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी विविध प्रशिक्षणे, मिनी मॅरेथॉन स्पर्धा, पाककला स्पर्धा इत्यादींचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेसाठी जेसिआय दापोलीचे अध्यक्ष जेसी डॉक्टर सुयोग भागवत, सचिव फराज रखांगे, कार्यक्रम प्रमुख जेसी अभिषेक खटावकर यांच्यासह अनेक जेसीआय दापोलीच्या सदस्यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गोमती अमृते यांनी मानले