सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार प्रदान

Google search engine
Google search engine

 

पुणे येथे एसीईआरटी च्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र संस्थेचा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार ५ मार्च रोजी पुणे येथे प्रदान करण्यात आला. एससीईआरटी च्या उपसंचालक डॉ कमलादेवी आवटे यांच्या हस्ते माजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे, डॉ. गोविंद नांदेडे, डॉ. दिनकर टेमकर, एटीएम चे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सुप्रसिद्ध गझलकार गिरीश जोशी यांनी पुरस्कार प्रस्तावांचे परीक्षण केले. सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला काव्य रसिक मंडळ डोंबिवली यांचा राज्यस्तरीय पुरस्कार याआधी प्राप्त झाला आहे. ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र ( एटीएम ) अर्थात कृतिशील शिक्षक महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील विविध साहित्यकृतींना संस्थेच्या साहित्य संमेलनात राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. महाराष्ट्र भर विविध शैक्षणिक उपक्रम राबवणारी, कृतिशील शिक्षकांसाठी साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून त्यांच्या कला गुणांना वाव देणारी शैक्षणिक चळवळ म्हणून एटीएम ची राज्यभरात ओळख आहे.

राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहातील कविता सामाजिक बांधिलकी जोपासत तरल संवेदना प्रकट करणारी वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ असणाऱ्या आहेत. परिवर्तनाचे विचार अत्यंत संयमाने समाजात रुजविणाऱ्या या काव्यसंग्रहाने मराठी साहित्यात मौलिक भर घातली आहे. अल्पावधीतच राखायला हवी निजखूण हा काव्यसंग्रह समीक्षक तसेच रसिक वाचकांच्या पसंतीस उतरला आहे. या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.