तळवली ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली येथील प्रसिद्ध व नवसाला पावणारी अशी ख्याती असणारी तळवलीची ग्रामदेवता श्री सुकाई देवीच्या शिमगोत्सवाला दि 6 सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.यावेळी श्री सुकाई देवीची पालखी ग्रामदेवता मंदिरातून सहाणेवरती ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आली.
येथील श्री सुकाई देवी ग्रामदेवता ही जागृत व नवसाला पावणारी म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणाहून भाविक तिच्या दर्शनासाठी येत असतात. या ग्रामदेवतेचे खेळे दुसऱ्या होळीपासून गावभोवणीसाठी बाहेर पडतात. तसेच शेवटच्या होळीच्या दिवशी देवीची पालखी मंदिरातून मोठ्या उत्साहात भाविक नाचवत सहाणेवरती आणतात.यावेळी आंब्याचे झाड म्हणजेच माडवळ तोडून ते देखील देवीच्या पालखीसोबत नाचवत आणण्याची प्रथा या ठिकाणी आहे. यासाठी नोकरीनिमित्त देशी परदेशी असलेले चाकरमानी आवर्जून उपस्थित राहतात. अशाच पद्धतीने यावर्षी देखील देवीची पालखी व माडवळ नाचवत मोठ्या उत्साहात गावातून सहाणे वरती आणण्यात आली. त्यानंतर रात्री होम पेटवून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम पार पडला.

या शिमगोत्सव कालावधीत देवीची पालखी वाडी वस्ती वरती फिरणार आहे त्याचप्रमाणे या काळात सहाण भरणे देवीचा गोंधळ व पेवेगावची प्रसिद्ध ग्रामदेवता झोलाई देवी या दोन बहिणींच्या पालखी भेटीचा कार्यक्रम पार पडणार आहे. हा पालखी भेट सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होत असते. यावेळी देवीच्या शिमगोत्सवात पालखी व माडवळ नाचवण्यासाठी भाविक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गुढीपाडव्यापर्यंत श्री सुकाई देवीचा हा शिमगोत्सव चालणार असून गुढीपाडव्याला या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.दरवर्षी अत्यंत शांततेत हा शिमगोत्सव साजरा करण्यात येतो. या शिमगोत्सवात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन ग्रामदेवता कमिटी अध्यक्ष गणपत शिगवण व सचिव प्रदीप चव्हाण यांनी गावाच्या वतीने केले आहे.