राजापूर | प्रतिनिधी : आरएचपी फाउंडेशन रत्नागिरी या संस्थेच्या सदस्या समीता कुळये आणि कल्पना भागन यांनी गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्याकडे दिव्यांगांसंदर्भातील निवेदन दिले. दिव्यांगांना मिळणार्या अर्थसहाय्यामधे सुधारणा सुचवली आहे.
प्रामुख्याने दिव्यांगांना पंचायत समितीतर्फे जो ५ टक्के निधी मिळतो. त्यामधून दिव्यांगांना उत्पादक घटक बनविण्याच्या उद्देशाने प्रत्येक दिव्यांगांना किंवा सामुहिक पद्धतीने अर्थसहाय्य दिले तर ते स्वत:च्या पायावर उभे राहून अर्थार्जन करतील. आपल्या कुटुंबालाही अर्थिक हातभार लावतील. ज्यामधे दिव्यांगांना स्टॉल उभारण्यासाठी आणि स्टॉलमधे सामान भरण्यासाठी अर्थसहाय्य, हातगाडी घेणेसाठी अर्थसहाय्य, स्वयंचलीत इलेक्ट्रीकल तीन चाकी गाडी घेण्यासाठी अर्थसहाय्य करावे. जेणेकरुन गाडीवरुन फिरता व्यवसाय करता येईल. मच्छी व्यवसाय करणार्यांना होडीचे सामान, जाळीचे सामान घेण्यासाठी अर्थसहाय्य करावे. विद्यार्थ्यांना उपयोगी संगणक संच, लॅपटॉप, मोबाईल घेण्यासाठी अर्थसहाय्य, छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करावे. उदाहरणार्थ फळांचा रस काढण्याचे मशीन, कागदी ग्लास, पत्रावळ्या, मेणबत्ती बनवण्याचे मशीन आदी विकत घेता येईल. या मागणीच्या पत्राचा सहानुभुतीने विचार केला गेला तर प्रत्येक दिव्यांग स्वावलंबी बनेल, असे समीता कुळ्ये यांनी सांगितले.