शिमगोत्सवाला धडाक्यात प्रारंभ
राजापूर | वार्ताहर : राजापूर शहरात मंगळचारी होळीचा सण पारंपारिक पध्दतीने अपार उत्साहात साजरा करण्यात आला. शहराची ग्रामदेवता श्री निनादेवीची राजहोळी खेळविण्यासाठी आणि पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्याचबरोबर जवाहर चौक येथील श्री देव चव्हाटा, आणि श्रीदेव रवळनाथाची अशा तीन होळया खेळविण्यात आल्या.
राजापूर तालुक्याच्या ग्रामिण भागातही सोमवार आणि मंगळवारी गाव होळया तोडुन होलीकोत्सव साजरा करण्यात आला. शहरात समर्थनगर, वरचीपेठ, दिवटेवाडी, खडपेवाडी, गुरववाडी, कोंडेतड आदी विविध भागातही पारंपारिक पध्दतीने होळया खेळवून सणाचा आनंद साजरा करण्यात आला. गावागावात आंबा-पोफळीच्या झाडाच्या होळया तोडून त्या नाचवितानाचे दृश्य पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनतर गाव मांडावर होळया उभ्या करून होम पेटवून रखवालीचे गाऱ्हाणे घालत शिमगोत्सवाला धडाक्यात प्रारंभ झाला.
राजापूर शहराच्या ‘राज’ होळीला मंगळवारी दुपारनंतर प्रारंभ झाला. दुपारी होळी तोडल्यानंतर नगर वाचनालय ते जवाहर चौक या अशी होळी नाचविण्यात आली. फाका देत ढोलताशांच्या गजरात होळी खेळविण्यात येऊन त्यांनतर नगरवाचनालयाच्या पाठीमागील मांडावर ती उभी करण्यात आली. त्यानंतर जवाहर चौकातील श्रीदेव चव्हाट्यातील, कामादेवीची व देव रवळनाथाची होळी खेळवत उभी करण्यात आली.
या होळ्या खेळविण्याचे दृश्य पाहण्यासाठी मार्गाच्या दुतर्फा शहर व परिसरातील अबाल वृध्द स्त्री पुरूष नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी शहरातील विविध भागांतील तसेच बंगलवाडी, गुरववाडी, वरचीपेठ, आंबेवाडी, चव्हाणवाडी आदी विविध भागातील युवकांनी मोठया संख्येने सहभागी होताना होळी खेळवत सणाचा आनंद लुटला.