महिला आणि दिव्यांगत्व – एक चिंतन

आस्था सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजन

रत्नागिरी | प्रतिनिधी : दि.07/03/2023 रोजी आस्था विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे थेरपी सेंटर, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मारुती मंदिर रत्नागिरी येथे सकाळी 11 वाजता जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये महिला आणि दिव्यांगत्व या विषयावर चिंतन करण्यात आले. अंध महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी श्रीम. विजया मेस्त्री, सुनीता गोळपकर, संपदा कांबळे विचारपिठावर उपस्थित होत्या. अस्थिव्यंग महिला प्रतिनिधी सारा व समरीन करीम नाईक, श्रीम. रेणुका पड्यार,शबनम तहसीलदार, शिल्पा गोठणकर, पल्लवी पांचाळ यांनी आपले विचार व्यक्त केले.

कार्यक्रमात आपल्या दिव्यांग मुलांच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या व त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या “सुपर मॉम “1.सम्राज्ञी संजय चाळके, 2.योगिता राजेश पडवळ 3.झरीना करीम नाईक,4.प्रीताशा प्रभाकर घोसाळकर यांचा सत्कार आस्थाच्या सचिव सुरेखा पाथरे यांच्या हस्ते करण्यात आला. अपंगत्वावर मात करत उत्कृष्ट काम करणाऱ्या श्रीम.प्रीती रतिलाल पटेल, व्यवस्थापक ओबीसी महामंडळ यांना देखील सन्मानित करण्यात आले.दिव्यांग मुलांच्या माता, महिलांनी आपले प्रश्न पत्रकार परिषदेमध्ये मांडले.ज्यात मुख्यतः दिव्यांग मुली व महिलांसाठी जिल्हा स्तरावर वसतीगृह असावे,बालकांसाठी डे- केअर युनिट ची आवश्यकता आहे,दिव्यांग महिलांच्या आरोग्यासाठी शासनाने विशेष तरतुदी करण्याची आवश्यकता आहे, अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार महिलांना सुविधांची आवश्यकता आहे,अंध दिव्यांग महिलांसाठी स्वयंचलन अर्थात मोबोलिटी प्रशिक्षणाची आवश्यकता आहे,नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांना आपल्या दिव्यांग मुलांना थेरपी,दवाखाना,शाळा, इत्यादी ठिकाणी ने आण करण्यासाठी प्रवास सुविधांची गरज आहे,हे व या सारखे अनेक प्रश्नाचे लेखी निवेदन उद्या महिला दिनी जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचे ठरले. माता पालक नुरीन काझी,अकीला वस्ता,रेश्मा तांबोळी, मिताली नाचणकर, वैशाली पवार, कामिनी गांगन, कनीज महिमकर, रसिका झोरे, समृद्धी नेवरेकर, अमृता लोध उपस्थित होते.आस्था हीत चिंतक श्रीम.उमा दांडेकर, श्रीम.शुभांगी अत्रे,श्रीम. समृद्धी पतंगे यांनी कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणुन काम पाहिले. कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी संकेत चाळके यांच्या नेतृत्वाखाली आस्थाच्या सर्व कार्यकर्त्यांनी काम बघितले.