कणवलीचे माजी आमदार प्रमोद जठार यांचा पाठपुरावा
राजापूर | वार्ताहर : संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मारकासह जिल्ह्यातील अन्य चार महत्वपुर्ण कामांना सिंधुरत्न योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मधुन निधी देण्याची मागणी कणकवलीचे माजी आमदार व सिंधुरत्न योजनेचे सदस्य प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे केली आहे.
या मागणीअनुषंगाने जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांना अंदाजपत्रकासह परिपुर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली आहे.
संगमेश्वर कसबा येथील धर्मवीर संभाजी महाराज स्मारक परिसराचा पर्यटनदृष्टया विकास करण्यासाठी दोन कोटी, चिपळूण येथील श्री क्षेत्र पर्शराम येथे पर्यटन दृष्टया विकास व सुशोभिकरण करणेसाठी दोन कोटी, संगमेश्वर येथील श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे पर्यटन दृष्टया विकास व सुशोभिकरण करणे कामी दोन कोटी, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांना जाणाऱ्या रस्त्यांना दिशादर्शक फलक व स्वागत कमानीचे पर्यटन दृष्टया बांधकाम करणेकामी पाच कोटी, राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेतील ऐतिहासिक वास्तुमध्ये संग्रहालय निर्मिती करणे या कामी दोन कोटी रूपये मंजूर करावेत अशी मागणी जठार यांनी केली आहे.
याबाबत जठार यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे पत्र्यवहार केला आहे. तर जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडून या पत्राची दखल घेत कार्यकारी अभियंता चिपळून व रत्नागिरी यांना प्रस्तावित कामाचा अंदाजपत्रकासहीत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.