आदर्श गाव संकल्पना सर्वांपर्यंत पोहोचावी!

गोळवण येथे उपसंचालक  सुरेश भालेराव यांचे प्रतिपादन

आदर्श गाव संकल्पनेअंतर्गत विशेष ग्रामसभा

मसुरे | झुंजार पेडणेकर : गावालाच आपले विश्व मानून काम केल्यास गावचा विकास होण्याबरोबरच गावात आर्थिक सुबत्ता निर्माण होईल. ग्रामपंचायतने आदर्श गाव संकल्पना गावातील तळागाळातील प्रत्येक ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी असे प्रतिपादन गोळवण ग्रामपंचायत येथे झालेल्या आदर्श गाव संकल्पना विशेष ग्रामसभेत या संकल्पनेचे उपसंचालक सुरेश भालेराव यांनी केले.   शासनाच्या आदर्श गाव संकल्पना व प्रकल्प समितीतर्फे गोळवण कुमामे डिकवल ग्रामपंचायत येथे पाहणी  कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालयात आदर्श गाव योजना उपसंचालक कृषी आयुक्तालय पुणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. गोळवण सरपंच सुभाष लाड, उपसरपंच साबाजी गावडे, तांत्रिक सहाय्यक चंद्रकांत गोरे, जिल्हा कृषी तंत्र अधिकारी सचिन कांबळे, तालुका कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी, मंडळ कृषी अधक अधिकारी ए. आर. कांबळे, कृषी पर्यवेक्षक डी. के. सावंत, उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण ओहोळ, अनिकेत साळुंखे, कृषी अधिकारी संजय गोसावी, रामेश्वर कृषी सेवा संस्थेचे मंगेश सावंत, ग्रामपंचायत क्षेत्रातील अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका माधुरी कामतेकर, संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपसंचालक सुरेश भालेराव म्हणाले, आदर्श गाव संकल्पना ही राज्य पुरस्कृत योजना १९८२ पासून महाराष्ट्रात सुरू असून तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या संकल्पनेतूनच या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. हिवरे बाजार, राळेगणसिद्धी या गावात प्रथम या योजनेतून आदर्श गाव संकल्पना यशस्वीपणे राबविण्यात आली. मात्र प्रत्येक गावात ही योजना राबविण्यासाठी गावात एकसंधता असणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अशा कला आणि कामगिरीचा विकास झाला पाहिजे की त्यातून निर्माण झालेल्या वस्तूंना बाहेर किंमत मिळेल. त्यातून गावातील कुटुंबांना आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडून गाव विकासाला मदत होईल. जेव्हा ग्रामीण भागातील महिला, पुरुष कलाकार, कवी, चित्रकार, शिल्पकार, संशोधक, भाषा पंडित निर्माण होतील तसेच गावातच लघु ग्रामोद्योग सुरू होतील तेव्हाच आपला गाव आदर्श गाव संकल्पनेच्या निकषात बसून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरेल. असे भालेराव यांनी सांगितले. या संकल्पनेबाबत ग्रामस्थांत असणाऱ्या जनजागृती बाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

गोळवण ग्रामपंचायत तर्फे आदर्श गाव संकल्पनेच्या निकषानुसार सप्तसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. यात नशाबंदी, नसबंदी, कुऱ्हाड बंदी, बोअरवेल बंदी, चराईबंदी,  व श्रमदान यांचा समावेश आहे. ग्रामस्थांनी गाव विकासाच्या संकल्पना मांडल्या. आदर्श गाव संकल्पनेच्या आराखड्यात समाविष्ट होण्याच्या दृष्टीने गावात जनजागृती करण्यात येत असल्याचे सरपंच सुभाष लाड यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या मोठ्या उपस्थिती बद्दल सरपंच लाड यांनी सर्वांचे आभार मानले. सुत्रसंचालन विनोद सातार्डेकर, प्रास्ताविक उपसरपंच साबाजी गावडे यांनी केले