पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्ती पाहणाऱ्या महिला बचत गटाना प्रमाणपत्र देऊन केला गौरव
रत्नागिरी | प्रतिनिधी
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पंचायत समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन कै.शामरावजी पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे करण्यात आले होते.
सदर महिला मेळाव्याचे उद्घाटन किर्ती किरण पूजार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पाणी पुरवठा योजनांची देखभाल व दुरुस्तीसाठी नळ पाणी पुरवठा योजना महिला बचत गटाकडे देण्यात आल्या अशा अनुक्रमे क्रांती उत्पादक महिला बचत गट, इंदवटी , ता.लांजा, जिजाऊमाता महिला बचत गट, मालगुंड ता.रत्नागिरी व स्वामीनी महिला बचत गट धाऊलवल्ली, ता.राजापूर या बचत गटांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी किर्ती किरण पूजार यांनी जिल्हामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांची संचालन, देखभाल दुरुस्ती व नियोजन हे महिला बचत गटाना देण्याचे नियेाजन असून महिला बचत गटाने सेवापुरवठादार (Service Provider) म्हणून या क्षेत्रामध्ये काम केले पाहीजे.
सदर मेळाव्याला श्री.राहुल देसाई, प्रकल्प संचालक (पा.व स्व.), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुध्द आठल्ये, गट विकास अधिकारी, पंचायत समिती रत्नागिरी श्री. जे. पी. जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्री.गावडे, उमेदच्या प्रतिनिधी श्रीम.वायंगणकर, श्रीम.बोरकर व महिला बचत गटाच्या सदस्या व आशा सेविका इ. उपस्थित होते.