प्रोत्साहन अनुदान तातडीने खात्यावर जमा करून मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला : चेअरमन राजन नानचे

Google search engine
Google search engine

डिव्हिडंट वाटपाच्या शुभारंभानंतर बळीराजाची दिवाळी गोड होणार 

मात्र निसर्गाच्या कोपामुळे, बळीराजा चिंतेत

नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे संबंधित विभागांना मुख्यमंत्र्यांचे आदेश, कृषी विभाग नुकसानग्रस्तांच्या बांधावर सक्रिय !

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : शासनाने यापूर्वीच घोषित केलेल्या, परंतु अंमलबजावणी करण्यात असमर्थ ठरल्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर, काही तासातच सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान तातडीने जमा करून,मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. याबद्दल फोंडा परिसरातील तमाम शेतकऱ्यांच्या आणि संचालकांचे वतीने अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यात येत आहेत,असे प्रतिपादन फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नानचे यांनी व्यक्त केले.
नियमित कर्जपेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, प्रोत्साहन अनुदान खात्यावर जमा करून शेतकरी कुटुंबीयांची दिवाळी गोड केली आहे. त्याचप्रमाणे गेली कित्येक वर्षे दिला जाणारा सोसायटीचा १५% डिव्हीडंट सुद्धा दिवाळीपूर्वी देण्याचा शुभारंभ केल्याने बळीराजा सुखावला आहे.

मात्र अशाही परिस्थितीत निसर्गाच्या अवकृपेने गेली दोन-तीन वर्षे गांजलेला शेतकरी, चालू वर्षी सुद्धा सततच्या पावसाने चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच नुकसानग्रस्तांच्या नुकसानभरपाईचे पंचनामे तातडीने पूर्ण करून,अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याने, तालुका कृषी विभाग सक्रिय झाला असून, चक्क फोंडाघाट मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचला आहे.गेले चार दिवसापासून विजांच्या कडकडाटा सह पडणाऱ्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे, उभे पीक जमीनदोस्त झाले असून पाण्याखाली गेले आहे. लोंब्याना पुन्हा कोंब आलेले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी सहायकांशी संपर्क साधण्याचे आवाहन सोसायटी संचालकांनी केले आहे.

नुकसान पंचनामे करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मुळे मॅडम, सुपरवायझर वेर्लेकर मॅडम, कृषी मंडळ अधिकारी पवार, चेअरमन नानचे,कृषी सहाय्यक प्रणाली सावंत, संचालक ध्रुवबाळ गोसावी, नुकसानग्रस्त शेतकरी बाळकृष्ण हिर्लेकर,कुमार नांचे, वैशाली बिले, दशरथ रेडकर, आत्माराम सावंत,आबा तीरोडकर, प्रकाश नांचे,विजय सामंत, मारुती राणे, रामचंद्र गोसावी, अविनाश गोसावी इत्यादी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी भाताच्या लोंब्या दाखवून,आलेले मोड आणि आपले नुकसान संबंधितांना दाखवले.