एकात्मिक बालविकास सेवा योजना मालवण प्रकल्प विभागाचा महिला मेळावा संपन्न

Google search engine
Google search engine

 

डॉ. राहुल पंतवालावलकर, ॲड. रुपेश परुळेकर यांचे आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन ; मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण | प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प विभागाच्या वतीने कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उदघाटन डॉ. राहुल पंतवालावलकर, ॲड. रुपेश परुळेकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी पराडकर, मुख्यसेविका स्नेहा सामंत, उल्का खोत, प्राजक्ता तुळसकर, स्नेहल गावडे, मंगल जंगले यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. राहुल पंत वालावलकर व ॲड. रुपेश परुळेकर यांनी उपस्थिताना मौलिक मार्गदर्शन केले. आहार, आरोग्य, कुटुंब व्यवस्था, कायदे, शिक्षण, न्याय हक्क याबाबत विचार मांडले.

ॲड. रुपेश परुळेकर म्हणाले, महिलांवर होणारे अत्याचार, अन्यायाच्या विरोधात महिला उभ्या राहणार नाहीत. तोपर्यंत अत्याचार करणाऱ्यांना अत्याचार करता नये याबाबतची दहशत निर्माण होणार नाही. त्यामुळे महिलांनी अशा प्रकारांविरोधात सक्षमपणे उभे राहून लढा द्यायला हवा. पती पत्नीत टोकाचे वाद, समाजातील वाढत्या घटस्फोटांची प्रकरणे पाहता विवाहसंस्कृती संपत चालली आहे का अशी भीती निर्माण झाली आहे. प्रत्येकाला दोष देऊन यातून मार्ग सुटणार नाही. त्यामुळे महिलांनीही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कुटुंबातील वाद हे कुटुंबातच मिटविले पाहिजेत. स्त्रीची जशी समजून घेण्याची जबाबदारी आहे तशीच ती पुरुषाचीही आहे. स्त्रीचा आत्मसन्मान आपण ठेवायला पाहिजे. जी जी माणसे मोठी झाली त्यात महिलांचे योगदान मोठे राहिले आहे. असे परुळेकर म्हणाले, यावेळी डॉ. पंतवालावलकर यांनी महिलांना आरोग्याबाबत मार्गदर्शन केले.

विविध स्पर्धेचा निकाल- पाककृती स्पर्धा
प्रथम- घावणे भाजी, विद्या सावंत वायंगणी अमरेवाडी, द्वितीय- खोबऱ्याची वडी, भारती दळवी, तळगाव देऊलवाडी, तृतीय- शेवगा भाजी भाकरी, सोलकडी, वैभवी भांडारकर, काळसे माळकरवाडी, अनौपचारिक शिक्षण हस्तकला- प्रथम- धामापूर बौद्धवाडी, सेविका शीतल नाईक, द्वितीय- सर्जेकोट, सेविका सीमाली परब, तृतीय- त्रिंबक बागवेवाडी, सेविका वर्षा जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन उल्का खोत यांनी केले. स्नेहा सामंत यांनी आभार मानले.