२५ कोटींची तरतूद करावी ; मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची उपमुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांच्याकडे मागणी
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग किल्ल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे असे सिंधुदुर्ग वासीय आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना वाटते. सिंधुदुर्ग किल्ला भारतातील एक उत्कृष्ट ऐतिहासिक स्मारक व्हावे या करता २५ कोटी रुपयांची तरतूद करून निधी उपलब्ध व्हावा. अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे केली आहे.
भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला हा अत्यंत जीर्णावस्थेत आहे. सदर किल्ल्याचे जतन व संवर्धन करुन एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून किल्ला नावारुपास येण्यासाठी “किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती” ने भारतीय पुरातत्व खाते (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याच्या पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास आराखडा तयार केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी तयार केलेल्या विकास आराखड्याच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग किल्ला हा भारतातील उत्कृष्ट ऐतिहासिक स्मारक होणेसाठी किमान २५ कोटी रुपयांची तरतूद करण्याबाबत विनंती केली आहे.
तरी सिंधुदुर्ग किल्ला विकास आराखडयासाठी किमान २५ कोटी रुपयांची तरतूद करुन निधी उपलब्ध करुन देण्याबाबत विनंती आहे. असे पत्र मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.