आरवली येथे आंबा काजू कलम बागेला आग ; सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथे श्री देवी सातेरी मंदिर च्या वरील बाजूस डोंगराळ भागात मंगळवारी दुपारी आंबा काजू कलम बागेला अचानक लागलेल्या आगीत येथील शेतकऱ्यांच्या आंबा काजू कलमांचे एकूण सुमारे ८ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
या आगीत गुंडू वसंत आरोलकर यांची ३० काजू कलमे व ३८ आंबा कलमे जळून २ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. सुरेश जयराम मयेकर यांची ८५ काजू कलमे जळून २.५० लाखाचे नुकसान, श्रीपाद अमृत गुरव यांची ३० काजू कलमे जळून १ लाख रुपयांचे नुकसान व प्रवीण शरद आरोलकर यांची ११० काजू कलमे जळून ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच कुडाळ येथील अग्निशमक बंब बोलाऊन आग आटोक्यात आणण्यात आली.