कर्तव्य जबाबदारी पार पाडताना आरोग्यही तितकेच महत्वाचे- माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी

Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी : महिलांनी आपले कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडतांना आपल्या स्वत:च्या आरोग्याची योग्य ती खबरदारी घ्यावी. हाच सल्ला पुरुषांनाही लागू होतो असे विचार जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सई धुरी यांनी व्यक्त केला.जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेतील स्थानिक निधी व लेखा कार्यालयात महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक बाळासाहेब पाटील, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, आयुषच्या डॉ. कृपा गावडे जिल्हा माहिती कार्यालयचे उपसंपादक रणजित पवार उपस्थित होते.
डॉ. धुरी म्हणाल्या, नोकरीच्या निमित्ताने अनेक महिला घराबाहेर पडतात. घर आणि नोकरी सांभाळताना कसरत करावी लागते. अशावेळी मानसिकता सकारात्मक ठेवून, आरोग्य चांगले ठेवण्यावर भर दिला पाहिजे. अनेक संकटे येत राहतील त्यावर मात करण्यासाठी सज्ज असले पाहिजे, हे सर्व करताना आपल्या जोडीदाराला व कुटुंबालाही प्राधान्य दिले पाहिजे.
सहायक संचालक बाळासाहेब पाटील म्हणाले, स्त्री व पुरुष ही संसाराच्या रथाची दोन चाके आहेत. या दोघांनीही एकमेकाला सांभाळून घेवून संसाराचा गाडा चालविला पाहिजे तरच आयुष्य सुखकर होईल. स्त्रीयांनी स्वत:च्या आरोग्याबरोबरच कुटुंबाच्या आरोग्याचीही योग्य पध्दतीने काळजी घेतली पाहिजे.

जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते म्हणाले, अर्धे जग हे महिलांचे आहे तर उर्वरीत जग हे महिलांमुळे आहे, त्यामुळे हे सारे जगच महिलांवर अवलंबून आहे. महिलांना सर्वच पातळीवर आपली भूमिका पार पाडावी लागते. तिच्या पासून सुरुवात असते.सर्वकाही तीच असते त्याच्या पलिकडे काही नसते.आयुषच्या डॉ. कृपा गावडे म्हणाल्या, महिलांनी आपल्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देणे आवश्यक आहे. कुटुंबाचा मुळ आधार महिला असल्यामुळे त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते. अशा वेळी स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी निसर्गाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन आपल्या बरोबरच कुटुंबालाही निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

महिला बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, उपसंपादक रणजित पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.यावेळी कनिष्ठ लेखापरीक्षक श्रध्दा पाटील, लेखा लिपीक नीलम हळदणकर, प्राजक्ता पवार यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशेष लेखा परीक्षक पांडुरंग थोरात यांनी केले.