मंडणगड | प्रतिनिधी : विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आली. संयुक्त राष्ट्राची 2023 सालच्या महिला दिनासाठी थीम ‘डीजी ऑल: संशोधन आणि तंत्रज्ञानाचा वापर लिंगभाव समानतेसाठी’ अशी असून या थीमचा उद्देश आहे की जगभरात ज्या महिला आणि मुली तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणात जे योगदान देत आहेत ते ओळखून त्याचा यथोचित सन्मान करण्यासंदर्भात आहे. महाविद्यालयातील महिला विकास मंचने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी आयोजित कार्यक्रमात तृतीय वर्ष बीएमएस मधील विद्यार्थीनी कु. चिन्मयी पावसकरने कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत आजच्या दिनाचे महत्व आणि जागतिक महिला दिन साजरा करण्याचे कारण स्पष्ट केले. यानंतर राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस सहा. प्रा. सायली घाडगे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रशासकीय कर्मचारी सुजाता सकपाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण कअभिवादन करून सर्वाना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आले.
त्यानंतर सहा. प्रा. सायली घाडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, “मी सर्वप्रथम महिलांच्या हक्कासाठी लढलेल्या सर्व महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करते. आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. अगदी राष्ट्रपती अर्थात आपल्या देशातील सर्वोच्च पदावर देखील आज महिला आहे पण खंत या गोष्टीची वाटते कि जेव्हढी महिलांची संख्या आहे त्या प्रमाणात हे प्रतिनिधित्व फारच कमी आहे. महिलांच्या अधिकाराबाबत बोलायचे झाले तर महिलेला जर एक व्यक्ती म्हणून स्वीकारले तरी बरेचसे प्रश्न सुटतील. त्यासाठी प्रत्येक वेळी महिलांसाठी असणाऱ्या कायद्यांची आठवण करून देण्याची वेळ येणार नाही.” अध्यक्षीय समारोपात बीएससी आय टी विभागप्रमुख सहा. प्रा. राजेंद्र राऊत म्हणाले कि महिला दिनानिमित्त प्रतिनिधिक स्वरुपात आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांना आज आपण अभिवादन करतो. महिलांसाठी त्यांनी केलेले कार्य सर्वाना ज्ञात आहे. पण जागतिक महिला दिनाची बीजे 1908 च्या न्यूयॉर्क मधील कामगार चळवळीत रोवली गेली. क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. महिला दिवसाला संयुक्त राष्ट्रांची अधिकृत मान्यता 1975 साली मिळाली. पुढे ते महिला दिनाची सुरवात भारतात कधी व कशी झाली सांगत सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या महिला विकास मंच आणि सांस्कृतिक विभाग यांच्या वतीने तृतीय वर्ष बीएमएस या वर्गाने केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष बीएमएस मधील विद्यार्थीनी कु. चिन्मयी पावसकर तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी कु. सानिका साळुंखे यांनी केले. महाविद्यालयातील शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपपरीसरचे प्र. संचालक डॉ. किशोर सुखटनकर आणि महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. अंशुमन मगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.