गाय व म्हैस यांच्या कमी केलेल्या दूध दराबाबत केली चर्चा
लांजा (प्रतिनिधी) लांजा सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच कोल्हापुर येथे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली आणि कमी केलेल्या गाय व म्हैस यांच्या दूध दराबाबत चर्चा केली.तसेच गाय व म्हैस दूध दर वाढवून मिळणे बाबत त्यांना निवेदन सादर करण्यात आले.
कोल्हापूर येथील गोकुळ दूध संस्थेने गाई व म्हैशीचा दुधाचा दर कमी केला आहे .या पार्श्वभूमीवर लांजा सहकारी दूध व्यवसायिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर येथे जाऊन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांची भेट घेतली आणि कोकणातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. कोकणातील भौगोलिक परिस्थितीत सध्याचे खाद्याचे वाढलेले दर या संबंधात सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये सध्या बाजारात गाय व म्हैस यांना लागणारा चारा खाद्य यांचे दर भरपूर वाढलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याला दूध व्यवसाय परवडणारा झालेला नाही .आज बाजारात पत्रि पेंड १६०० प्रतिपोतं, खाद्य १५०० व भुसा १२५०, सरकी पेंड १४०० प्रतिपोते असे भरसमाट दर वाढलेले आहेत.
त्यामुळे आपण दुधाला जो दर दिला आहे तो उत्पादकांना परवडणारा नाही .आणि कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता कोकणामध्ये या घडीला महिन्यापासून ते जून महिन्यापर्यंत ओला चारा मिळणे दुरापास्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता आपण यापूर्वी गाय व म्हैस दुधाला जो दर देत होता तोच दर परत यापुढे देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आणि याबाबतचे निवेदन त्यांना सादर करण्यात आले.
दरम्यान गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी शेतकरी या संस्थेचे पदाधिकारी यांचे म्हणणे
लक्षात घेऊन लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. याकामी आरडीसी बँकेच्या संचालक अजित यशवंतराव यांनी सहकार्य केले. तर या चर्चेप्रसंगी लांजा दूध व्यवसायिक संस्थेचे चेअरमन अनिल देसाई, व्हाईस चेअरमन श्रीधर मांडवकर, संचालक धाकट्या रखांगी, लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे संचालक महेश सप्रे तसेच सुनील पावस्कर ,संस्था सचिव श्री कोटकर ,सिताराम लांबोरे हे उपस्थित होते.