महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी देशाच्या पायाभरणीत योगदान देण्यासाठी सज्ज व्हावे….. जानवळे सरपंच सौ. जान्हवी शिरगावकर – विखारे, यांचे प्रतिपादन

पाटपन्हाळे (वार्ताहर) पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. ए. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आणि गुहागर तालुक्यातील जानवळे गावच्या विद्यमान सरपंच, सौ. जान्हवी शिरगावकर-विखारे, व पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती सुचिताकाकी वेल्हाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रम हा महाविद्यालयातील आय. क्यू. ए. सी. अंतर्गत महिला विकास कक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी सौ. जान्हवी शिरगावकर-विखारे, यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला विकास कक्षाच्या समन्वयिका प्रा. सौ. सौम्या चौघुले यांनी केले.
महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक सौ. स्नेहल संसारे, प्रा. एल. एम.एस्सी. गजभिये, प्रा. चैत्राली ढिंबर, डॉ. जालिंदर जाधव, डॉ. प्रसाद भागवत, डॉ. प्रवीण सनये, डॉ. दिनेश पारखे, डॉ. कृष्णाजी शिधे, डॉ. सुभाष खोत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख वक्त्या सौ. जान्हवी शिरगावकर – विखारे, यांचे महाविद्यालयीन विद्यार्थिनींकरीता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानातून त्यांनी म्हटले की, महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच प्रत्येक विद्यार्थिनीने शारीरिक, मानसिक तसेच बौद्धिकदृष्ट्या सुदृढ होऊन कुटुंब, समाज तसेच देशाच्या पायाभरणीत योगदान देण्यासाठी सज्ज व्हावे. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा श्रीमती सुचिताकाकी वेल्हाळ यांनी आपल्या मनोगतातून महिलांनी कोणतीही गोष्ट मनावर घेतली तर अशक्य नाही असे म्हणून महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी. ए. देसाई यांनी अध्यक्षीय मनोगतात समाज सुरक्षित करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांची महिलांविषयीची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे असे मत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी अवतीभोवती असणाऱ्या प्रलोभनांना बळी न पडता ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून मार्गक्रमण केल्यास यश हमखास मिळते असे सुतोवाच त्यांनी केले व सर्व उपस्थित विद्यार्थिनींना व मान्यवरांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दिक्षा पवार (FYBCOM) हिने केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार कु. मृणाली देकर हिने (TYBCOM) मानले.