तहसीलदारांनी स्वतः दिले जिल्हाधिकारी यांच्यासह खनिकर्म, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र
मंडणगडमधील अवजड वाहतूक प्रश्न
मंडणगड : प्रतिनिधी : मागील सुमारे सहा महिन्यांपासून मल्टी एक्सल वाहनांच्या सहाय्याने तालुक्यातून बॉक्साईट खनिजाची अनधिकृत ओव्हरलोड अवजड वाहतूक सुरु आहे. या वाहतुकीविरोधात तहसीलदार मंडणगड यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ, पत्रकार यांनी वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत. आंदोलनाचे इशारे देण्यात आली आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार यांनी आपल्या अधिकारांच्या मर्यादा स्पष्ठ करत जिल्हाधिकारी, जिल्हा खनिकर्म विभाग व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना स्वतः पत्रव्यवहार केला आहे. या अवजड वाहतुकीला विरोध लक्षात घेता तालुक्यात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे प्रकर्षाने नमूद करत या समस्सेकडे लक्ष देवून योग्य कार्यवाही करण्यासंदर्भातील मागणी पत्रात नमूद केली आहे.
यातील तक्रारदार मंडणगड तालुका पत्रकार संघ यांना या पत्राची प्रत देण्यात आली आहे, या पत्रातील माहितीनुसार, मंडणगड तालुका पत्रकार संघ यांचे दिनांक २३ फेब्रुवारी रोजीचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झाले आहे. अर्जदार यांनी तालुक्यात सुरु असलेली विना परवाना अवजड वाहतूक तातडीने थांबविणे बाबत विनंती केली आहे, तसेच नोव्हेंबर २०२२ पासून मंडणगड तालुक्यातील चिंचघर ते लाटवण या मार्गावरील चार राज्यमार्ग व एक राष्ट्रीय मार्गावरील सुमारे ६० किमी अंतराचा वापर ओव्हरलोड मल्टी एक्सल वाहनांचे वाहतूक करिता राजरोसपणे सुरु आहे. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याचे साईडपट्टी सह रस्त्याची अवस्था खराब झाली आहे. पावसाळा तोंडावर असल्यामुळे तालुक्यात सुरु असलेली विनापरवाना वाहतूक पुढे जाऊन बंद न केल्यास वाहतुकीने होणाऱ्या नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तरी सदर कामी अनधिकृत अवजड वाहतुकी संदर्भात तातडीने कारवाई करण्यात यावी. या विनापरवाना वाहतुकीवर कारवाई न केल्यास मंडणगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने सर्व पत्रकार जनतेसमवेत व विविध संघटनेच्या सहकार्याने तीव्र आंदोलन हातात घेणार असल्याबाबत या
कार्यालयास निवेदनाद्वारे कळवले आहे.
आशापुरा मायनिंग ही कंपनी मौजे रोवले ता. दापोली येथे आशापुरा बॉक्साईट उत्खनन करून रोवले ते करंजाडी मार्गे ( मंडणगड तालुका ) वाहतूक करीत आहे, सदर वाहतूक ओव्हरलोड होत असून त्यामुळे येथील रस्ते वाहतुकीस प्रतिकूल होत आहेत. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अवजड वाहतूक होत आहे. रस्त्याची साईडपट्टी खराब होत आहे. या वाहतुकीमुळे अपघात होत आहेत. इत्यादी कारणांसाठी कारणांसाठी कार्यालयात विविध संघटना, ग्रामस्थ, राजकीय प्रतिनिधी, पत्रकार इत्यादी यांची निवेदने प्राप्त होत आहेत. तहसील कार्यालयात सबंधित अर्जदार तसेच कंपनी व्यवस्थापन, सबंधित शासकीय विभाग या कार्यालयात बैठका घेवून चर्चेद्वारे प्रश्न सोडविणेबाबत प्रयत्न करण्यात आलेले आहेत. तथापि सद्यस्थितीत सर्व तक्रार, अर्जदार, संघटना, राजकीय प्रतिनिधी, इत्यादी आंदोलनापासून परावृत्त होत नाहीत. वारंवार या कार्यालयात आंदोलनाचे निवेदन देत आहेत. तालुक्यात या विषयामुळे कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या विषयकामी ओव्हरलोड बाबत कारवाई करणेबाबत या कार्यालयाकडून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना वारंवार कळवण्यात आलेले आहे. तथापि त्यांचेकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नाही. पोलीस विभागालाही कार्यालयाकडून वारंवार कळवण्यात आलेले आहे. तरी कृपया आशापुरा कंपनीकडून होणाऱ्या वाहतुकीबाबत योग्य ते निर्देश कंपनी व्यवस्थापनास आपणाकडून कळविण्यास विनंती आहे, तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांना आपल्या कार्यालयामार्फत योग्य ती सूचना देण्यात यावी असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पत्राची प्रत उपविभागीय अधिकारी, उपविभाग दापोली, यांना देण्यात आली आहे.