राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेचा पुढाकार
लांजा | प्रतिनिधी : कोकणातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या तालुक्यातील माचाळ गावात पर्यटन बहरावे या हेतूने राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक ११ मार्च रोजी सापड लोककला व पर्यटन महॊत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवाला सिंधुरत्न समृद्धी योजनेचे निमंत्रक सदस्य प्रमोद जठार, किरण सामंत, कोकणभूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव, सुभाष लाड ,सुनिल कुरूप ,विवेक सावंत ,शिपोशी सरपंच हरेश जाधव, राजू भाटलेकर ,पालु- माचाळ च्या सरपंच सौ.वनिता नामे,उपसरपंच सागर गाडे,माचाळचे गावकर पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून नावारूपास आलेल्या निसर्गरम्य स्वर्गीय सौंदर्य लाभलेल्या माचाळ गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी रस्ता पोहोचला. त्यामुळे अजून तरी खऱ्या अर्थाने माचाळ पर्यटनसमृद्ध आहे. आता त्या गावाच्या विकासाची नवी दालने उघडणार आहेत. त्यातूनच जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे नवे माचाळ हिल स्टेशन जगाच्या पर्यटन नकाशावर येणे आता दूर नाही, मात्र ” लोकल टू ग्लोबल माचाळ”च्या या विकासप्रकियेत १००-२०० वर्षांपूर्वीचे कोकणातील गाव कसे होते याची ओळख एकविसाव्या शतकात करून देणारी ‘माचाळची ग्रामीण संस्कृती’ जपायला हवी. कारण माचाळच्या आल्हाददायक, थंड हवेच्या गिरीस्थानासोबतच ग्रामीण संस्कृती जोपासणाऱ्या लोकजीवनातही जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती आहे. हे लक्षात घेऊन माचाळ मधील लोकसंस्कृती व तिथल्या दीर्घायुषी बनविणाऱ्या ग्रामीण शाश्वत जीवनशैलीची ओळख करून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून माचाळ ग्रामस्थांच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
या महोत्सवाचा शुभारंभ दि.११मार्च रोजी दुपारी ठिक ०४:०० वाजता होणार असून या महोत्सवात माचाळ मधील निरोगी वातावरणात शतायुषीपूर्तीचा आनंद घेणा-या श्री व सौ.सखाराम भातडे या दांम्पत्याचा सन्मान केला जाणार आहे. सायंकाळी ०५:०० नंतर लोककला महोत्सवांतर्गत सापड लोककला,डफावरचे नृत्य, फुगडी नृत्य,जाखडी नृत्य, माचाळ विशेष नृत्य, आदिवासी व शेतकरी नृत्य या कार्यक्रमांचे सादरीकरण होणार असून यासोबतच माचाळ पर्यटनाची दिशा या विषयावर पर्यटन अभ्यासक लेखक धीरज वाटेकर , लेखक विजय हटकर यांचे व्याख्यान संपन्न होणार आहेत.तसेच लांज्यातील नवोदित लेखक विजय हटकर यांचे ‘ माझे माचाळ ‘-रत्नागिरी जिल्ह्यातील गिरिस्थान या पुस्तकाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन होणार आहे.तरी कार्यक्रमास उपस्थित राहून माचाळ या गावातील लोककलांचा व पर्यटनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संघाध्यक्ष सुभाष लाड यांनी केले आहे.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी माचाळ गावचे पाटील पांडुरग पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मेहनत घेत आहेत तर महेंद्र साळवी ,विजय हटकर, गणेश चव्हाण, रमेश काटकर, प्रमोद पवार ,दीपक नागवेकर,बंटी गाडे ,प्रकाश हरचेकर हे संघ सदस्य पूर्वतयारी करीत आहेत