अन्यथा आम्हाला संघर्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल- अशोकराव कदम

शालेय पोषण आहार वाहतूक रिबेट तसेच धान्य वाटप कमिशनचा प्रश्न तात्काळ सोडवा

चिपळूण | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना मागील आठ वर्षांपूर्वीचे शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत प्रलंबित वाहतुकीचे कमिशन व रिबेटचे देयक रक्कम तसेच नियमित धान्य वाटपाचे गेल्या सहा महिन्यांपासून तर गेल्या दोन महिन्यांपासून मोफत धान्य वाटपाचे कमिशन अद्याप मिळाले नाही. यामुळे रेशन दुकानदार आर्थिक संकटात सापडले असून याबाबत शासनाने त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा आम्हाला संघर्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कदम यांनी दिला आहे.

रेशन व्यवस्थित अन्न धान्य प्रणाली अधिक सक्षम गतिमान व पारदर्शक राबवण्यासाठी केंद्र व राज्य शासन नवनवीन संकल्पना मांडत असून या योजनांचा रेशन प्रणालीत सर्व नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रयत्नशील आहे. कोरोना काळात रेशन दुकानदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रेशन दुकानदारांना वाहतूक रिबेट व अन्नधान्य वाटप कमिशन साठी सातत्याने झगडावे लागत आहे. अजूनही या रेशन दुकानदारांचा संघर्ष संपलेला नाही.

यामध्ये आता शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत वाहतुकीचे कमिशन व रिबेटची रक्कम अद्याप मिळाली नाही सन २००२-२००३ जुलै २०१० अखेर ३१ लाख ८६ हजार ४४६ इतकी रक्कम रत्नागिरी जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना शासन देय आहे. यामध्ये मंडणगड तालुका १ लाख १२ हजार ७०८ रुपये, दापोली ५४ हजार ४८८, खेड ७ हजार ७११, गुहागर ८६ हजार ७६१, चिपळूण २२ लाख १५ हजार ७००, संगमेश्वर २ लाख ८८ हजार ६४४, लांजा ७१ हजार ७५४, राजापूर ३ लाख ४८ हजार ४४६ अशी तालुकानिहाय रेशन दुकानदारांना देय आहे. याबाबतचा जिल्हा पुरवठा विभागाने प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. मात्र, शासनाने या प्रस्तावाकडे अध्याप लक्ष न दिल्याने रेशन दुकानदार आर्थिक संकटात सापडले आहेत.

तसेच मागील सहा महिन्यांपूर्वीचे नियमित धान्य वाटपाचे कमिशन मिळाले नाही. याचबरोबर केंद्र शासनाने रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य जाहीर केले आहे. या मोफत धान्य वाटपाचे देखील दोन महिन्यांपासून कमिशन मिळालेले नाही. . एकंदरीत शासन रेशन दुकानदारांकडून आपल्या योजना राबवून घेत आहे. परंतु, या दुकानदारांना कमिशन देण्याबाबत हात आखडते घेत आहेत. याबाबत रेशन दुकानदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आता या दुकानदारांचा संयम सुटत चालला असला चालला असून याबाबत रत्नागिरी जिल्हा रेशन दुकानदार- केरोसीन चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आक्रमक झाले असून शासनाने याबाबत त्वरित कार्यवाही करावी. अन्यथा आम्हाला संघर्षात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा दिला आहे.