सहकार्याचे जनतेला जिल्हा क्षयरोग अधिकाऱ्यांचे आवाहन
रत्नागिरी | प्रतिनिधी : राज्य शासनाच्या आरोग्य : विभागामार्फत रत्नागिरी जिल्हयातील अतिजोखमीच्या भागात दिनांक ०८ मार्च २०२३ ते दिनांक २१ मार्च २०२३ या कालावधीत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन संशयित क्षयरुग्णांची तपासणी करुन निदान झालेल्या क्षयरुग्णांना प्रत्यक्ष उपचाराखाली आणणेसाठी प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिम ( Active Case Finding ) राबविण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी रत्नागिरी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली.
त्याअनुषंगाने, दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त मुदतीचा ताप, वजनात लक्षणीय घट, तसेच थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, मागील एक महीन्यापासून छातीत दुखत असल्यास, किंवा यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असल्यास अशी लक्षणे असलेल्या व्यक्तीनी वरील कालावधीत गृहभेटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपली तपासणी करुन घ्यावी व निदान झालेल्या क्षयरुग्णांना शासकिय आरोग्य संस्थेत मोफत औषधोपचार केले जातात, सदर मोहीम ही जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद रत्नागिरी किर्ती किरण पूजार, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी डॉ. श्रीम. एस. के. फुले, व जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी- डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
तसेच घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यास व स्वयंसेवकांना आपली उचित माहिती देवून सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी मदत करावी असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी रत्नागिरी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.