नामवंत गायकांना दिली वादनाची साथ
महाराष्ट्रातील ख्यातनाम ढोलकी पट्टू म्हणून श्री गावडे यांची ओळख
संतोष कुळे | चिपळूण : कला ही जीवनाची सावली आहे . या कलेतूनच माणूस यशाचे शिखर गाठू शकतो. आपल्यामधील असणारा छंद व्यक्तीला नावारूपाला आणतो. मात्र, यासाठी कठोर परिश्रम घेण्याची जिद्द त्या व्यक्तीमध्ये किंवा कलाकारांमध्ये असली पाहिजे. असाच महाराष्ट्रातील उत्कृष्ट ढोलकी पटू अशी ख्याती असणारे देवरुख चाफवली गावचे सुपुत्र अनिल तुकाराम गावडे यांनी आपल्या ढोलकीच्या तालावर महाराष्ट्रातील रसिकांना डोलण्यास भाग पडले आहे. असा अवलिया ढोलकी पटू यांनी ढोलकीची व तबल्याची साथ देत नामवंत गायक गायिका यांना देत स्वतःची गुणवत्ता सिद्ध केली आहे.
संगमेश्वर देवरुख तालुक्यातील चाफवली गावचे सुपुत्र अनिल गावडे यांचा जन्म मुंबईत झाला. प्राथमिक शिक्षण घेता घेता आपल्या गावात व मुंबई येथे साजरा होणाऱ्या भजन, नाच आणि मांड या कार्यक्रमात ते वडील व मोठ्या भावासोबत जात असत. याच ठिकाणी त्यांना तालवाद्याची पहीली ओळख झाली, आणि त्यातूनच वादनाची आवड व गोडी लागली. सर्वप्रथम त्यांनी ढोलकी वादनासाठी मोहन गोसावी यांच्याकडे प्राथमिक धडे गिरवले. मोहन गोसावी यांनी पहिल्यांदा बोट धरून ढोलकी वाजवायला शिकविले. नंतर ढोलकी वादनासाठी भजन कीर्तन व मांडाच्या ठिकाणी ढोलकी वाजवायला जाऊ लागलो. मुंबई येथे साई भजन मंडळे भजनाचे कार्यक्रम करीत असताना ढोलक या तालवाद्याचा सराव करु लागलो.. ढोलकी वादनात खऱ्या अर्थाने गती व प्रगती ढोलकीचा बादशहा असलेले गुरूवर्य अनंत पांचाळ यांच्याकडून शिक्षण घेताना झाली. त्यांनी पंडित रवी नवरे ,अनिल केरकर सदाशिवराव पवार, राजेंद्र अंतरकर, पखवाज गुरु ब्रह्मदेव सकपाळ अशा अनेक सुप्रसिद्ध ढोलकी व तबलावादक, पखवाज वादक यांच्याकडून ज्ञान प्राप्त केले आहे . शास्त्र शुद्ध तबला वादनाचे धडे त्यांनी घेत तबलावादनाच्या विविध परीक्षा सुद्धा उत्तीर्ण केलेल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय असा बाल्यानृत्य/जाखडी नृत्याच्या कार्यक्रमात कसलेल्या शाहीराना त्यांच्या मंडळांना आपल्या ढोलकीची साथ दिली. त्याचबरोबर अशोक हांडे यांच्या मंगल गाणी दंगल गाणी, सांजरांग व गांधार अशा वाद्यवृद्धांसोबत सुद्धा अनिल गावडे यांना वादन करण्याची संधी प्राप्त झाली . सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, श्रीधर फडके, माधव भागवत, सुचित्रा भागवत ,आशा भोसले शौनक अभिषेकी अशा महान गायकांना सुद्धा तबला व ढोलकीची साथ देण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. त्यामुळे निश्चितच अनिल गावडे यांची ढोलकी झाली बोलकी असे म्हटले जाते .याचबरोबर संगीत बावनखणी , वस्त्रहरण आणि स्वरसम्राज्ञी या नाटकासाठी सुद्धा त्यांनी वादन केले आहे. शाहीर रामचंद्र घाणेकर, कै. तुकाराम मानकर दत्ताराम आयरे या सारख्या नामांकित शक्ती तुरा कलेतील गायकांच्या अनेक ध्वनीफितीत ढोलकीची साथसंगत करून अनेक कॅसेटमध्ये अनिल गावडे यांची ढोलकी कडाडली आहे.
चिपळूण येथे झालेला लोककला महोत्सवात सुद्धा नमन या विषयावरती असणाऱ्या परिसंवादामध्ये अनिल गावडे यांनी सहभाग नोंदवला होता. त्यावेळी त्यांनी वादनाविषयी माहिती देत प्रत्यक्ष ढोलकी वादन सुद्धा करत त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली होती. महाराष्ट्र शासनाने त्यांना कायमस्वरूपी कार्यक्रम करण्याची परवानगी सुद्धा दिलेली आहे . अनेक मोठमोठ्या कार्यक्रमातून त्यांनी ढोलकी वादन करत आपल्या नावाचा ठसा उमटवलेला आहे . खाजगी वादनाचे क्लासेस काढून वादनाची आवड असणाऱ्या कलाकारांना ते कलेचे ज्ञान देत आहेत. मुंबईसारख्या ठिकाणी आपल्या या कलेतून त्यांनी निश्चितच सर्वांचे प्रेम मिळवले आहे. असा अवलिया ढोलकी पट्टू साधा सरळ आणि शांत स्वभावाचा असून नेहमीच परोपकारी भावना ठेवणारा आहे.