मळगाव पिंपळवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा
श्री देव जैन ब्राम्हण भजन मंडळ व ओमकार बचत गटाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : स्त्री आणि पुरुष ही जरी संसाररथाची दोन चाके असली तरीही आजच्या घडीला केवळ एका चाकावर हा रथ हाकणे फार कठीण झाले आहे. त्यामुळे पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून महिलांनीही संसाराचा भार वाहणे आवश्यक आहे. आज केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी व उत्कर्षासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई खात्याच्या माध्यमातून तसेच कॉयर बोर्ड च्या माध्यमातून महिलांसाठी पस्तीस टक्के सबसिडी असलेल्या कर्ज योजना उपलब्ध आहेत. या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी लहान मोठे उद्योग उभारून आर्थिक स्वयंपूर्ण होत स्वावलंबी व आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन सनराइज कॉयर क्लस्टर संस्थेच्या सचिव तथा महिला उद्योजिका श्रुती रेडकर यांनी केले.
मळगाव पिंपळवाडी येथील श्री देव जैन ब्राह्मण भजन मंडळ व ओमकार बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिन कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षिका सुधा देवण यांच्या हस्ते तर प्रमुख अतिथी श्रुती रेडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मार्गदर्शन करताना श्रुती रेडकर यांनी महिलांना आर्थिक स्वयंपूर्ण होण्यासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
आपण जीवनात जे काही आहे ते फक्त आपल्या आईमुळेच असून प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील आईचे स्थान हे एक मार्गदर्शक शिक्षिका व मैत्रीणीप्रमाणे असते. त्यामुळे मुलांनी आपल्या आईला विश्वासात घेऊन सुखदुःखे मांडावीत. आईच्या मार्गदर्शनाखाली राहिल्यास जिवनात काहीही कमतरता राहणार नाही. मुलींना घडविण्याचे कार्य आई करते व त्यातूनच यशस्वी महिला घडतात, असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुधा देवण यांनी केले.
यावेळी आयोजकांच्या माध्यमातून उपस्थित मान्यवर तसेच उपस्थित महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या प्रसंगी श्री देव जैन ब्राह्मण भजन मंडळाचे अध्यक्ष सतीश राऊळ, ओमकार बचत गटाचे अध्यक्ष महादेव राऊळ, माजी ग्रामपंचायत सदस्या सुजाता राऊळ, ब्राह्मणपाट ग्राम संघाच्या अध्यक्षा संगिता राऊळ, ज्येष्ठ महिला शकुंतला गावडे, शुभांगी राऊळ, कार्यक्रमाचे व्यवस्थापक सुभाष राऊळ, भगवान राऊळ, मनोज राऊळ आदींसह भजन मंडळ व बचत गटाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान राऊळ
तर आभार मनोज राऊळ यांनी मानले.