राजकीय नेत्यांच्या होर्डिंग्जमुळे मोती तलावाचे विद्रुपीकरण होत नाही का ..

हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांचा सवाल

मोती तलावाकाठची जागाच आठवडा बाजारासाठी योग्य

सांवतवाडी । प्रतिनिधी : मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहचविण्याचा भाजी विक्रेत्यांचा कुठलाही उद्देश नाही. फिरत्या विक्रेत्यांनी कायमच स्वच्छता राखली आहे. मात्र, तरीही आठवडा बाजार हलवायचा असेल तर जिल्हाधिकारी यांनी निश्चित केलेल्या उभा बाजारच्या जागेवर भरवला जावा. एका दिवसाच्या आठवडा बाजाराने तलावाचे विद्रूपीकरण होत असेल तर तलावाकाठी लावण्यात येणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हॉर्डिग्ज व बॅनरमुळे तलावाचे विद्रूपीकरण होत नाही का, असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा हाॅकर्स फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. संदीप निंबाळकर यांनी उपस्थित केला.

सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदिर येथे आठवडा बाजाराच्या वादग्रस्त मुद्द्यावरून विक्रेत्यांची बाजू मांडण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांच्यासोबत हाॅकर्स संघटनेचे सेक्रेटरी महेश परूळेकर, व्यापारी नाजिम पटेल, मजित मुल्ला आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर यांनी शहराचे वैभव असलेल्या मोती तलावाचे विद्रूपीकरण हा विषय पुढे आणला आहे. परंतु या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या भाजीविक्रेत्यांचा मोती तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचण्याचा कुठलाच हेतू नाही आणि यापुढेही राहणार नाही. केवळ गरिबांचा प्रश्न आला की विद्रूपीकरण आणि श्रीमंतांचा प्रश्न आला की विद्रूपीकरण नाही हे कुठेतरी चुकीचे आहे. सध्याच्या ठिकाणी असलेला बाजारामुळे जवळपास ३०० ते ३५० फिरत्या व्यापाऱ्यांना रोजगार उपलब्ध होतो तसेच नागरिकांना स्वस्त व मुबलक भाजी उपलब्ध होते. त्यामुळे ग्राहकांचा व फिरत्या व्यापाऱ्यांचा विचार करता सोयीचा असणाऱ्या जागेचा विचार व्हावा, अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.

हाॅकर्स संघटना ही सरकार मान्यता प्राप्त संघटना आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडून कुठल्याच निर्णयात फेरीवाल्यांना सामावून घेतले जात नाही. फेरीवाल्यांना सामावून घेतल्यास एखादा चांगला निर्णयही यातून होऊ शकतो. मात्र बऱ्याच वेळा प्रशासन स्वतःच निर्णय घेतं त्यामुळे वाद निर्माण होतात. आता तरी बाजाराची जागा बदलताना किंवा निश्चित करताना आधी फिरत्या व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी बैठक आयोजित करा. आम्ही सुद्धा लोकांपर्यंत पोहोचून त्यांची मते, संवाद, त्यांच्याशी हितगुज करून सत्य समोर आणणार आहोत. मात्र जोपर्यंत ग्राहकांना व विक्रेत्यांना आठवडा बाजाराची जागा मान्य होत नाही तोपर्यंत तलावाच्या काठावरील आठवडा बाजार अन्यत्र हलवू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

मोती तलावाकाठी आठवडा बाजारावर मुख्याधिकारी सहमत मात्र ..
यावेळी संघटनेचे सेक्रेटरी महेश परुळेकर म्हणाले, हॉकर्स संघटनेच्या माध्यमातून मुख्याधिकारी जंयत जावडेकर यांची भेट घेतली असता, मोती तलावाच्या काठावरील आठवडा बाजाराबाबत तेही सहमत आहेत. मात्र, वरिष्ठांचे आदेश किंवा मंत्री महोदयांची सूचना आल्यास आपल्याला ते पळावे लागतील असे ते म्हणाले. तसेच हाॅकर्स संघटना निर्माण करुन जागा निश्चित करण्यात यावी म्हणून मुख्याधिकारी यांचें लक्ष वेधले असल्याचे स्पष्ट केले.