गुहागर | प्रतिनिधी : गुहागर पंचायत समितीच्या वतीने यावर्षी हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात वेळंब येथील प्रयोगशील व सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे कष्टाळू शेतकरी विजय माळींनी SK-4 (स्पेशल कोकण -४)या हळदीच्या वाणांचा वापर करून रेकॉर्ड ब्रेक ७.३० किलोचा सर्वात मोठा हळदीचा गड्डा उत्पादीत केला आहे. विशेष म्हणजे हा गड्डा पुर्णत: सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे. याबद्दल विजय माळी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.वेळंब येथील विजय माळी हे हाडाचे व कष्टाळू शेतकरी. भाजीपाला, कडधान्य लागवड करू, उपलब्ध असलेल्या छोट्या नारळ सुपारीच्या बागेवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. माळी हे विशेषत: सेंद्रिय शेती करणारे . पंचायत समितीच्या विविध उपक्रमात ते भाग घेत असतात.शेतकरी प्रशिक्षण, प्रदर्शन, शेतकरी सहलींमध्ये त्यांचा कायम सहभाग असतो. पाच-सहा वर्षांपूर्वी पंचायत समिती गुहागर मध्ये आयोजित अशाच एका हळद लागवडीबाबतच्या प्रशिक्षणात उपस्थित राहून प्रशिक्षणादरम्यान प्रात्यक्षिकासाठी आणलेले SK-4 जातीचे हळकुंड कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या कडून घेतले. ती हळूहळू आपल्या शेतात वाढवली. यापूर्वीही याच हळकुंडापासून २.५०० ते तीन किलोचा गड्डा उत्पादीत केला होता. यावेळी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या सूचनेनुसार कुजलेले शेणखत, बायोगॅस संयंत्रापासूनचे सेंद्रिय खत, जिवामृतच्या ५मात्रा ,ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीचा वापर केला. त्यामुळे हळदीचा गड्डा चांगलाच पोसला.
वेळंब ग्रामपंचायतीच्या सरपंच समिक्षा बारगोडे, स्पेशल कोकण -४वाणाचे प्रणेते सचिन कारेकर,कृषी अधिकारी आर. के. धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद राणे, पोलिस पाटील स्वप्नील बारगोडे यांच्या उपस्थितीत हा हळदीचा गड्डा काढण्यात आला. यात ७.५०० किलोचा सर्वात मोठा गड्डा निघाला.
पंचायत समितीच्या या उपक्रमात गेली २०वर्ष प्रयोग करून आबलोली येथील प्रयोगशील शेतकरी सचिन कारेकर यांनी संशोधीत केलेल्याSK-4 (स्पेशल कोकण -४) या वाणांचा वापर करण्यात आला होता. सर्वात मोठा गड्डा उत्पादीत करणा-या शेकक-यांसाठी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी २५००/-,१५००/- व १०००/-रूपयाचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे.