शबयच्या बहाण्याने दुचाकी पळवण्याचा प्रयत्न फसला

Google search engine
Google search engine

सातार्डा – घोगळवाडी येथील घटना 

सातार्डा | प्रतिनिधी : शिमगोत्सवात शबयच्या निमित्ताने विविध रूपे दिसून येतात. अशातच सातार्डा घोगळवाडा येथे शबयच्या बहाण्याने पार्क केलेली दुचाकी  पळवण्याचा अज्ञात इसमाने प्रयत्न केला. मात्र, ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे दुचाकी तीन तासानंतर पालवनवाडी माळरान परिसरात शोधून सापडली. शनिवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.

घोगळवाडी येथील शुभम सगुण आसोलकर यांनी हिरो स्प्लेंडर दुचाकी दुपारच्या वेळी चावीसह घराच्या बाजूला ठेवली होती. दुपारी शबयसाठी आलेल्या इसमाने चावीसह असलेली दुचाकी पळवून नेली. शुभम आसोलकर यांनी दुचाकी नसल्याने लगतच्या शेजाऱ्यांना व मित्रांना आपली दुचाकी तुमच्याकडे आहे का  म्हणून चौकशीसाठी फोन केले. पण दुचाकी सापडली नाही. त्यानंतर घोगळवाडी, जाधववाडी, देऊळवाडी येथे दुचाकीची शोधाशोध केली तरीही दुचाकी सापडली नाही.

देऊळवाडी येथे थांबलेल्या ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांनी शुभम आसोलकर यांची दुचाकी  आगाऊ इसम नेत असल्याचे ओळखून श्री आसोलकर यांना फोन केला. तोपर्यंत ज्ञात इसमाने दुचाकी पालवनवाडी माळरान परिसरात लपवून ठेवली होती.

शुभम आसोलकर यांनी घोगळवाडी, देऊळवाडी, जाधववाडी याठिकाणी दुचाकीची शोधाशोध केली. निखिल पेडणेकर, सर्वेश पेडणेकर यांनी भटवाडी, पालवनवाडी मध्ये दुचाकीची शोधाशोध सुरु केली होती.पालवनवाडीतील माळरान परिसरात असलेल्या एका काजूच्या झाडाखाली शुभम आसोलकर यांची दुचाकी सर्वेश पेडणेकर व निखिल पेडणेकर यांना सापडली.

दुचाकी सापडल्याची माहिती शुभम आसोलकर यांना देण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य भाऊ मांजरेकर यांच्या तत्परतेमूळे लंपास करण्यात आलेली दुचाकी सापडली.