चिपळूण | प्रतिनिधी : तालुक्यातील नांदिवसे गणेशपुर जंगलात येथे वृक्षतोडीचा पर्दाफाश वन विभागाच्या पथकाने केला आहे. या घटनेने सह्याद्री खोऱ्यात जंगलतोड होत असल्याचे समोर आले असून वन विभागाने ७ हजार ५०० रुपये किंमतीचा लाकूड साठा पकडला आहे. भविष्यात वन विभागाला ही जंगलतोड रोखण्याचे आव्हान असणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात बेसुमार वृक्षतोड होत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. याबाबत जागरूक ग्रामस्थांमधून सातत्याने आवाज उठवला जात असला तरी लाकूड व्यापाऱ्यांकडून ही जंगलतोड थांबताना दिसत नाही. या बेसमार वृक्षतोडीमुळे सह्याद्री खोऱ्यातील जंगल बोडके होताना दिसत आहेत. पावसाळ्यात तर सह्याद्री खोऱ्यातील डोंगरांना भेगा पडल्याच्या घटना यापूर्वी उघडकीस आल्या आहेत.
वृक्षतोडीचे दुष्परिणाम समोर येत असताना देखील नांदिवसे जंगलात वृक्षतोड झाल्याचे समोर आले आहे. सह्याद्री खोऱ्यात वृक्षतोडीसाठी लाकूड व्यापाऱ्यांनी पद्धतशीरपणे रस्ते तयार केले असल्याचे देखील समोर येत आहे. वनविभागाच्या पथकाने सोमवारी नांदिवसे जंगलात मंगेश मधुकर शिंदे यांच्या ताब्यातील ७ हजार ५०० रुपये किंमतीचा लाकूड साठा पकडला असून या कारवाईला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या कारवाईवरून सह्याद्री खोऱ्यात बेसुमार वृक्षतोड होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.