शताब्दी चषक २०२३; श्री.विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूरच्या वतीने आयोजन
गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील अडूर येथील श्री.विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळाच्या क्रीडा विभागातर्गत शताब्दी महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून जिल्हास्तरीय मॅटवरील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील कबड्डीची पंढरी म्हणून ओळख ठेवणाऱ्या अडूर मधील या मंडळाच्या स्पर्धेचे यंदाचे हे ३४ वे वर्ष होते. या स्पर्धेमध्ये अनेक राष्ट्रीय व प्रो कबड्डी या व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मातब्बदार खेळाडू व पंच पॅनलचा समावेश होता. स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांची विक्रमी गर्दी व युट्यूब लाईव्ह द्वारे दहा हजारहून अधिक दर्शकांनी दाखविलेली उपस्थितीचा उच्चांक निश्चितच कौतुकास्पद होता. त्याचसोबत कोकणातील प्रसिद्ध असलेला पेटत्या होमातून धावणारा अडूर ग्रामदेवता सुंकाई मातेचा संकासुराचा खेळ यावेळी आयोजकांकडून प्रेक्षकांना दाखविण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमासाठी आयोजकांनी केलेले शिस्तबद्ध नियोजन उपस्थितांची मने जिंकण्यास पात्र ठरले.
सदर स्पर्धेतील शताब्दी चषक २०२३ या चषकावर वाघजाई कोळकेवाडी संघाने नाव कोरले. या अंतिम विजेत्या संघाला ओ.बी.सी.मोर्चा उत्तर रत्नागिरीचे अध्यक्ष संतोष जैतापकर यांच्या हस्ते रोख रक्कम ३३ हजार ३३३ रुपये व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. द्वितीय क्रमांक न्यू हिंद विजय चिपळूण संघाला प्राप्त होऊन रोख रक्कम २२ हजार २२२ रुपये व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकावर स्थानिक संघ तृप्ती नगर, अडूर या संघाने बाजी मारली. त्यांना रोख रक्कम ११ हजार १११ रुपये सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. तसेच चतुर्थ क्रमांक दापोली येथील अमर भारत टाळसुरे संघाला प्राप्त होऊन त्यांना रोख रक्कम ७ हजार ७७७ रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याचसोबत उत्कृष्ट चढाईपटू म्हणून प्रो कबड्डी मधील स्टार खेळाडू म्हणजेच वाघजाई कोळकेवाडी संघाचा कर्णधार अजिंक्य पवार यांस प्राप्त झाले. तर उत्कृष्ट पकडपटू म्हणून न्यू हिंद विजय चिपळूण संघाचा भूषण गुढेकर यांस देवून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून वाघजाई कोळकेवाडी संघातील होतकरू खेळाडू साईराज कुंभार यांस देवून सन्मानित करण्यात आले.