अडूर येथील श्री विठ्ठलाईदेवी मंडळाचा स्मरणिका प्रकाशन सोहळा

Google search engine
Google search engine

गुहागर | प्रतिनिधी : गुहागर तालुक्यातील श्री.विठ्ठलाईदेवी ग्रामविकास मंडळ, अडूर (रजि.) ही संस्था गेली अनेक वर्षे सार्वजनिक, धार्मिक, क्रीडा, शैक्षणिक, कला व आरोग्य या क्षेत्रात कार्यरत आहे. श्री.विठ्ठलाईदेवीच्या वार्षिक कार्यक्रमाचे शताब्दी महोत्सवी २०२३ हे वर्ष यंदा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आले. शताब्दी महोत्सवी वर्ष हा काळाचा एक मोठा टप्पा आहे. या टप्प्यात एका अखंड शतकाचा भव्य इतिहास सामावलेला आहे. स्मरणिकेच्या माध्यमातून हा लिखित इतिहास संकलित करण्यात आले आहे.

प्रस्तुत स्मरणिकेच्या माध्यमातून सदर मंडळाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या सात बलुतेदार समाजाच्या एकजुटीचा मागोवा घेण्यात आला आहे. याचसोबत या मंडळातील दिग्गज व्यक्ती होऊन गेलेले कोकणी जाखडी व ठोंबरी लोककलेचे प्रणेते कविवर्य हरी विठ्ठल अडूरवाला (धावडे) यांचा सविस्तर वृत्तांत कथन करण्यात आले आहे. तसेच गुहागर तालुक्यातील कबड्डीची पंढरी म्हणून अडूर गावातील ह्या मंडळाकडे का पाहिले जाते याचा मागोवा. त्याचप्रमाणे सदर मंडळाने जोपासलेल्या नऊ प्रकारच्या विविध लोककला कोणत्या व त्यांची पारंपारिक गाणी कोणती यांचा संग्रह या स्मरणिकेच्या माध्यमातून पहायला मिळतात. तसेच दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले त्या त्या शैक्षणिक वर्षातील ते मंडळातील १५ विद्यार्थी कोण यांचा सविस्तर तपशिल याठिकाणी घेण्यात आला आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रात कुठेही ऐकायला पहायला मिळत नाहीत अशी मंडळाची चालणारी वारकरी भजने मंडळाच्या अस्मितेचा मानबिंदू आहे असे का म्हटले जाते याचा मागोवा. तसेच मंडळाच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रस्तुत अंकाच्या माध्यमातून पाहता येईल.

अशा वाचनीय स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ३४ व्या जिल्हास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धेच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. या स्मरणिकेचे संपादन मंडळातील सदस्य श्री.दिनेश महादेव खेडेकर यांनी मंडळातील जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. सदर स्मरणिका प्रकाशन दरम्यान पं.समिती माजी उपसभापती पांडुरंग कापले, गुहागर तालुका तेली सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश झगडे, झी २४ तास पत्रकार प्रणव पोळेकर यांचे वडील प्रमोद पोळेकर, अडूर ग्रामपंचायत सरपंच शैलजा गुरव, उपसरपंच उमेश आरस, ग्रामदेवता सुंकाई देवस्थानचे अध्यक्ष विलास विचारे, मंडळाचे अध्यक्ष गोपाळ झगडे व अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.