अवजड डंपर वाहतूकी विरोधात ग्रामस्थ आक्रमक!

Google search engine
Google search engine

 

वाळू डंपर रोखत ग्रामपंचायतीला दिले निवेदन

मसुरे | झुंजार पेडणेकर : मसुरे येथील खाजणवाडी ते खोत जूवा जेटी रोड या कच्च्या मार्गावरून होणारी वाळू वाहतूक सोमवारी संध्याकाळी ग्रामस्थांनी एकत्र येत रोखून धरली. याबाबत संबंधित प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.सदर वाहतुकी बाबत यापूर्वी सर्व संबंधित अधिकारी वर्गाला निवेदन देऊनहि अद्याप पर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये महसूल प्रशासना विरोधात नाराजी पसरली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी येथील सुमारे शंभर ग्रामस्थांनी मर्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे धाव घेऊन मर्डे सरपंच संदीप हडकर यांना डंपर वाहतुकीस विरोध असल्याबाबतचे निवेदन देऊन त्वरित लक्ष वेधण्याची मागणी केली.सोमवारी संध्याकाळी उशिरा खाजणवाडी आणि खोत जुवा ग्रामस्थांनी एकत्र येत या अवजड वाहतुकीस विरोध दर्शविला आणि रेतीने भरलेला डंपर अडविला तसेच या वाहतुकीमुळे येथील रस्ता खराब होणार असून रस्त्याची रुंदी पाहता भविष्यात या ठिकाणी अपघात होऊन मोठी जिवंत हानी होण्याचाही धोका असल्यामुळे ही वाहतूक अडवून धरण्यात आली होती. अखेर मसुरे पोलीस प्रशासन, मर्डे सरपंच संदीप हडकर यांनी या ठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांना योग्य त्या मार्गाने न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्या नंतर अडवून ठेवलेले डंपर सोडण्यात आले.

ग्रामस्थांची ग्रामपंचायत येथे धडक

मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा खाजणवाडी आणि खोत जूवा येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मर्डे ग्रामपंचायतचे सरपंच श्री संदीप हडकर यांना लेखी निवेदन दिले.
कांदळवन सह व्यवस्थापन समिती खोत जूवा वतीने खोत जूवा येथील शिनाना पालन प्रकल्पाला या वाहतुकीमुळे मोठा धोका उत्पन्न असल्याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकारी, तहसीलदार, खणीकर्मा अधिकारी, मर्डे सरपंच यांना काही दिवस पूर्वी दिले होते. परंतु हे निवेदन देऊनही अद्याप पर्यंत संबंधित सर्व अधिकारी वर्गाने याबाबत कोणती ठोस कृती केली नसल्यामुळे नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी निवेदन देऊनही या सर्व संबंधित अधिकारी वर्गाने हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून ग्रामस्थांच्या निवेदनाला कचऱ्याची टोपली दाखवल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे.

न्याय न मिळाल्यास आंदोलन छेडणार

याबाबत बोलताना मर्डे सरपंच संदीप हडकर म्हणाले, ग्रामस्थांच्या पूर्वीच्या निवेदनाच्या प्रतीवरून आम्ही सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले होते परंतु त्यांच्याकडून कोणतीही ठोस कृती झालेली नव्हती. आजच्या या डंपर वाहतूक रोखणे आणि सदरची रेती वाहतूक या भागातून न होण्यासाठी मंगळवारी मालवण तहसीलदार, खणीकर्म अधिकारी, आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे लेखी निवेदनावरून लक्ष वेधणार असून ग्रामस्थांना त्वरित याबाबत न्याय मिळाला पाहिजे अशी रोखठोक ठाम भूमिका मांडली. जर ग्रामस्थांना योग्य तो न्याय मिळाला नाही तर ग्रामस्थांसोबत आपण राहणार असून उग्र आंदोलन छेडण्याचा ही इशारा त्यांनी यावेळी दिला.
येथील हा कच्चा एक किलोमीटर चा रस्ता त्यावेळी खाजनवाडी ग्रामस्थांनी आपल्या जमिनी देऊन खोत जूवा बेटावरील पूरग्रस्त भागातील ग्रामस्थांना, त्यांच्या शालेय मुलांना, महिलावर्गाला तसेच आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्रासदायक ठरणाऱ्या रुग्णांना योग्य ते सहकार्य करण्याच्या उद्देशाने या रस्त्याला मंजुरी मिळवून काम करून घेतले होते.
तसेच हा एक किलोमीटर चा रस्ता संपल्यानंतर सुमारे ७० मीटरचा रस्ता हा येथील खाजगी ग्रामस्थांच्या मालकीचा असून शासन दप्तरी त्याची कोणती नोंद नाही. आणि या ठिकाणी पुन्हा अवजड वाहतूक होण्याच्या भीतीपोटी येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी हा रस्ता अवजड वाहतुकीस बंद केला आहे.
प्रशासनाने रेती उत्खननास ज्या भागात परवानगी दिली आहे त्या भागात खोत जूवा या बेटावरील ग्रामस्थांसाठी मसुरे येथून नळ पाणी योजनेचे पाईप नदी मधून गेलेले आहेत. याच भागात जर ही होडी वाहतूक होत असून होडीच्या फॅन मुळे येथील जलवाहिन्या वारंवार तुटण्याचा संभव होणार आहे. याबाबत प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी असेही येथील ग्रामस्थांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. तरी याबाबत योग्य तो न्याय मिळावा अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.
यामध्ये सुनील मसुरकर, बलवंत गावकर, शंकर गावकर, सुरेखा गावकर, रमेश गावकर, नूतन गावकर, शंकर खोत, साईप्रसाद खोत, रणजीत खोत, प्रताप खोत आदीसह सुमारे ७० ते ८० ग्रामस्थांनी सह्यांचे निवेदन संबंधितांना दिले आहे.

अवजड वाहतुकीस तीव्र विरोध

मंगळवारी सकाळी मर्डे ग्रामपंचायत येथे या प्रश्नासंदर्भात मर्डे सरपंच संदीप हडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली असून या सभेमध्ये सुद्धा येथे होणाऱ्या अवजड वाहतुकीस तीव्र विरोध करण्यात येईल असे ठरविण्यात आले. यावेळी उपसरपंच राजेश गावकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, पंढरीनाथ मसुरकर, पप्पू मुळीक तसेच स्थानिक ग्रामस्थांनी विचार मांडले. यावेळी मसुरे पोलीस अधिकारी श्री प्रमोद नाईक यांनी भेट देऊन कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच हा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन सोडविण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले.