खारवीवाडी शौचालय दुरुस्ती कामातही घोटाळा!
काम पूर्ण होण्याआधीच पं. स.अधिकाऱ्यांनी दिले कामाचे अंतिम मूल्यांकन!
पालशेत: | वार्ता : गुहागर तालुक्यातील पालशेत ग्रा. पं.हद्दीत अलीकडेच झालेल्या शौचालय दुरुस्ती कामात सातत्याने घोटाळा झाल्याचे निष्पन्न होत असून शौचालय दुरुस्ती घोटाळ्यांची जणू मालिकाच सुरू आहे.नुकतेच झालेल्या खारवी वाडी शौचालय दुरुस्ती कामातही घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे हे काम पूर्ण होण्या आधीच गुहागर पं. स.बांधकाम उपविभागाचे विभाग अभियंता आणि उप अभियंता यांनी आठवडाभर आधीच या कामाचे अंतिम मूल्यांकन दिले.त्यामुळे सन्माननीय पंचायत समिती अधिकारी आणि ग्रा. पं.पदाधिकाऱ्यांच्या संपूर्ण सहकार्य आणि साथीने ही घोटाळा मालिका सुरू असल्याचे बोलले जात आहे.
ग्रा
स्तरावरील १५व्या वित्त आयोगा तून सन २०२० – २१ मध्ये सदर खारावी वाडी शौचालय दुरुस्ती चे काम घेण्यात आले होते.₹ १,८८,१५९/- अंदाजपत्रकिय आर्थिक तरतूद असलेल्या या कामाचा ठेकेदार सागर शंकर पवार आहे.हे काम दि.२२/९/२०२२ रोजी सुरू झाले आणि दि.५/१०/२०२२ रोजी पूर्ण झाले.ग्रामपंचायतीच्या बांधकाम समितीनेही कोणतीही खातरजमा न करता आपला अहवाल देऊन टाकला. विहित नमुन्यातील काम पूर्णत्वाचा फलक कामाच्या ठिकाणी लावण्यात आला. मात्र ५/१०/२०२२ रोजी पूर्ण झालेल्या या शौचालय दुरुस्ती कामाचे अंतिम मूल्यांकन बांधकाम उप विभाग पंचायत समिती गुहागरच्या विभाग अभियंता आणि उप अभियंता यांनी आपल्या सहिने ₹ १/८८/१५९/- किमतीचे अंतिम मूल्यांकन जा. क्र. डिइ/झेड.पी./व्हीसी/२२ – २३ ने दि.२७/९/२०२२ रोजीच दिले.आता ही घाई पं. स.अधिकाऱ्यांना नेमकी का झाली असावी हा विषय संशय निर्माण करणारा आहे.किंबहुना यामध्ये पं. स.चे अधिकारी, ग्रा. पं.पदाधिकारी आणि लबाड ठेकेदार यांच्यामध्ये मिलीभगत असल्याचे निष्पन्न होत आहे.पंचायत समिती अधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ठेकेदार यांच्यात’अर्थ’ पूर्ण संबंध असल्याखेरीज वारंवार अशाप्रकारे घोटाळ्यावर घोटाळे होऊ शकत नाहीत.हे एव्हाना स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे.अंतिम मूल्यांकन प्राप्त होताच ग्रामपंचायतीनेही काम पूर्ण झालेले नसताना तातडीने २१/१०/२०२२ रोजी पूर्ण रक्कम ठेकेदाराला अदा केली.असा आक्षेप माजी ग्रा. पं.सदस्य नरेंद्र नार्वेकर यांनी गटविकास अधिकारी,पंचायत समिती,गुहागर यांच्याकडे केलेल्या लेखी तक्रारीत घेतला आहे.सातत्याने पालशेतमध्ये झालेल्या शौचालय दुरुस्ती घोटाळ्यातील सर्व दोषींवर कडाक कारवाई करावी अशी मागणी नार्वेकर यांनी केली आहे.
या आधीही १५ व्या वित्त आयोगातून पालशेत ग्रा. पं.हद्दीत अलीकडेच करण्यात आलेल्या प्राथ.शाळा कालेवठार, प्राथ.शाळा.बारभाईच्या शौचालय दुरुस्ती कामातही अशाप्रकारे घोटाळा झाला आहे.त्याबाबतही पंचायत समितीकडे लेखी तक्रारी कागदोपत्री पुराव्यांनिशी करण्यात आल्या.पंचायत समिती कार्यालयासमोर येथील जागरूक ग्रामस्थांनी उपोषण केले.यावेळी उपोषण कर्त्याच्या मागणीनुसार योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन मा.गटविकास अधिकाऱ्यांनी दिले.सत्तेचा दुरुपयोग करून शासनाचा आणि पर्यायाने जनतेचा पैसा अशाप्रकारे हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई होणार का?याकडे आता पालशेत वासियांचे लक्ष लागले आहे.मात्र याबाबत काहीच कारवाई झाली नाही तर पुन्हा पंचायत समिती गुहागर कार्यालयासमोर उग्र आंदोलन करणार असल्याचे नरेंद्र नार्वेकर यांनी सांगितले आहे.