सावंतवाडी । प्रतिनिधी : सिक्युअर क्रेडिएन्शियलच्या मॉडेल आणि विरेनियम क्लाऊड व ऍडमिशनच्या सहकार्याने शुक्रवार १७ मार्च रोजी सकाळी वाजता सावंतवाडी येथील श्री पंचम केमराज महाविद्यालयाच्या सभागृहात सिंधुदुर्ग करिअर समुपदेशन यात्रेचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे .या यात्रेचे उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे खेमराजेसाहेब सावंत भोसले यांच्या हस्ते आणि सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमास श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल उपस्थित राहणार आहेत.
मॉडेल करिअर सेंटरच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व्यवसाय आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मॉडेल करिअर सेंटर्स ने गेल्या वर्षभरात हजाराहून अधिक तरुणांना करिअर कौन्सिलिंग आणि १२५ उद्योग संस्था समूहातील तीन हजाराहून अधिक उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिले आहेत. मॉडेल करियर सेंटरने सावंतवाडी आणि कुडाळ येथे नुकत्याच घेतलेल्या रोजगार मेळाव्यातही प्रत्यक्षपणे सुमारे ३०० तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिले आहेत. सिंधुदुर्गातील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच त्याला त्या संदर्भातील प्रशिक्षण मिळावे या दृष्टीने ही करिअर समुपदेशन यात्रा आयोजित केली आहे.
या यात्रेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना तज्ञ कौन्सिलर द्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे पण नोकरीच्या संधी कशा आणि कुठे उपलब्ध करावेत याबाबत योग्य मार्गदर्शन नसल्याने विद्यार्थी द्विधा मनस्थितीत असतो. अशा विद्यार्थ्यांना नोकरीच्या मुलाखती कशा द्याव्यात, स्वतःचा बायोडाटा कसा निर्माण करावा, स्वतःमधील गुणवत्ता कशी ओळखावी आणि त्याचबरोबर उद्योग आणि रोजगार सुरू करण्यासाठी कोणत्या प्रशिक्षणाची गरज आहे. याबाबत सखोल असे मार्गदर्शन या समुपदेशाने यात्रेत केले जाणार आहे.सिक्युअर क्रेडेन्शिअलने सावंतवाडी आणि कुडाळ येथे मॉडेल करिअर सेंटरची उभारणी केली असून त्याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा बायोडेटा एकत्रित केला जात असून ,त्यांना या सेंटर द्वारे मार्गदर्शन केले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध क्षेत्रात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी या सिंधुदुर्ग करिअर समुपदेशन यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मॉडेल करिअर सेंटर्सने केले आहे.