हरी हरी रामढोल.. शिमगा शिरवळ..म्हणत देवीच्या नावाचा कलश फिरतो गावात
चिपळूण | वार्ताहर : शिमगा उत्सवामध्ये प्रत्येक तालुका आणि गावामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत . या वेगवेगळ्या प्रथांनुसार शिमगा उत्सव साजरा होत असतो. अशीच चिपळूण तालुक्यातील श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता बामनोली हे मंडळ सुद्धा गेल्या अनेक पिढ्या शिमग्याची एक आगळी वेगळी प्रथा जतन करत आनंद घेत आहेत. ,”हरी हरी रामढोल..शिमगा शिरवळ” अशा घोषणा देत देवाचे शिंपणे झाल्यानंतर रात्री ही मंडळी ग्रामस्थांच्या प्रत्येक घराघरात जाऊन डोक्यावर कलश घेत ढोल ताशाच्या गजरात हरी हरी रामढोल म्हणत शिधा जमवण्याचे काम करतात.
ग्रामदेवतेचा शिमगा उत्सव होळी पौर्णिमेपासून सुरू झाल्यानंतर प्रत्येक वाडीत श्री चंडकाई वाघजाई ग्रामदेवता भोवनीसाठी फिरते. यावेळी माहेरीवासिनी सुहावासिनी लहान थोर मंडळी देवीची पूजा करून सेवेचा लाभ घेतात. संपूर्ण गावात पालखी फिरल्यानंतर शेवटच्या दिवशी देवीचा गोंधळ सहाणेवर होतो. नंतर देवाचे शिंपणे कार्यक्रमाला सुरुवात होते.
हा शिंपणे कार्यक्रम करताना सचिन ओक यांच्या निवासस्थानातून पालखी वाजत गाजत मंदिराच्या दिशेने निघते. त्यानंतर शेरणी शोधण्याचे काम देवीच्या माध्यमातून केले जाते. नंतर पालखी वाजत गाजत मंदिरात प्रवेश करते. यावेळी देवाचे शिंपने कार्यक्रम पार पडतो. मात्र गेली अनेक पिढ्या या ग्रामदेवता मंडळांने आगळी वेगळी प्रथा जपलेली आहे. ती प्रथा म्हणजे हरी हरी रामढोल..शिमगा शिरवळ म्हणत ग्रामस्थ देवाची पेटी देवाच्या मंडपात घेऊन जातात. यावेळी सोबत देवीच्या नावाचा कलश डोक्यावर घेत आणि ढोल ताशा वाजवत सर्व मंडळी होम लावलेल्या जागेला प्रदिक्षणा मारत पुन्हा देवाच्या मंडपात जातात. गावात पालखी प्रत्येक ग्रामस्थांच्या घरी नियोजन पद्धतीने जशी फिरली त्याच पद्धतीने हे रामढोल मंडळी प्रत्येकाच्या घरात रात्रीचा ढोल वाजवत देवीच्या नावाचा जयघोष करीत प्रत्येकाच्या घरी जातात. हरी हरी रामढोल बोलत अंगणात नाचण्याचे काम करतात. त्यानंतर घरातील सुहासिनी त्यांना तांदूळ आणि त्यासोबत दक्षिणा सुद्धा देण्याची प्रथा आहे. असे करत करत गावातील प्रत्येक घरामध्ये हे रामढोल मंडळी जात असतात. यामध्ये युवा पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. कलस डोक्यावरती घेत शेवटचं घर होईपर्यंत फिरण्याचे काम एक व्यक्ती करत असते.
आणि या रामढोल मंडळीची संपूर्ण ग्रामस्थ मंडळी वाट पाहत असतात. एक वेगळा शिमग्याचा आनंद या हरी हरी रामढोल कार्यक्रमातून सर्वजण घेतात. बुधवार दिनांक 15 रोजी रात्रीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये देवस्थानचे अध्यक्ष बाबूराव डिंगणकर, उपाध्यक्ष तानाजी वणे, मानकरी संतोष कुळे, विकास वने, राजाराम घाणेकर, रवींद्र कपले, नरेश पागडे, सुरेश वणे, मुंबईतून आलेली चाकरमानी आणि गावातील युवा मंडळी सर्व या रामढोल मध्ये सहभागी झाले होते. रात्री दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम पार पडला . हा वेगळा आनंद देणारा क्षण होता. देवीच्या नावानं शिधा मागत देवीचा कलश गावात फिरवण्याचे काम या मंडळींनी केले. दरवर्षीही प्रथा सुरू असते. त्यानंतर जमलेल्या शिधा व दक्षिणेतून देवीच्या नावाचा प्रसाद बनवला जातो. याला रामढोलवाल्यांचे जेवण असेही म्हणतात. अशी ही वेगळी प्रथा आजही बामणोली मधील श्री चडकाई वाघजाई ग्रामदेवता मंडळ जपत आहे.