रवि जाधव व सहकार्यांनी जपली ‘सामाजिक बांधिलकी’
सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी बाजारपेठेमध्ये गेली दोन वर्षे एक बांद्यातील तर दुसरी माडखोलमधील अशा दोन वयोवृद्ध बेवारस महिला एकमेकांच्या संगतीने रस्त्यावर तर कधी केसरकर कॉम्प्लेक्स परिसरात भंगार विकून हाल अपेष्टांचं जीवन जगत होत्या. अखेर सामाजिक कार्यकर्ता दुर्गेश रेगे यांनी पुढाकार घेऊन अणाव येथील संविताश्रमचे संचालक संदीप परब यांच्याशी संपर्क करून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव,साहित्यिक विठ्ठल कदम, दत्तप्रसाद फोंडेकर ,सुधीर पराडकर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कायदेशीर प्रक्रिया करून त्यांची रवानगी संविताआश्रम मध्ये केली.
थंडीच्या काळामध्ये शहरांमध्ये फिरत असलेल्या या बेवारस दोन्हीही महिलांना सामाजिक बांधिलकीकडून नवीन चटई व ब्लॅंकेट देण्यात आले होते. तसेच कोरोनाच्या काळामध्ये सामाजिक बांधिलकीच्या टीम कडून त्यांना अधून मधून जेवणाचीही व्यवस्था केली जात असे. कोरोनानंतर त्यांचे दिवसेंदिवस होत चाललेले हाल पाहून त्या दोघींची रवानगी पणदूर येथील सविता आश्रम मध्ये करण्यासाठी सामाजिक बांधिलकीकडून खूप प्रयत्न झाले. परंतु सदर दोन्ही महिला आश्रम मध्ये जाण्यासाठी तयार नव्हत्या.
सहा महिन्यापूर्वी त्यातील एका महिलेचा अपघात होऊन डोक्याला ७ टाके पडले होते. त्यावेळीही सामाजिक बांधिलकीने त्यांना सहकार्य केले होते. वाढत्या वयोमानामुळे त्यांची सारखी चिडचिड होत असे व त्याचा राग त्या येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर व दुकानदारांवर काढत असत. त्या नेहमीच लोकांशी हुज्जत घालून भांडत असायच्या. त्यामुळे बऱ्याच वेळा लोकांनी व दुकानदारांनी त्यांची तक्रारही केली होती. त्यांच्या अशा नेहमीच्या वागण्याने पोलीस कर्मचारीही वैतागून गेले होते.
त्यामुळे त्यांची रवानगी संविताश्रमात केल्याने स्थानिक नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. तसेच अतिशय चांगल कार्य केलं म्हणून सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव व सामाजिक कार्यकर्ते दुर्गेश रेगे, विठ्ठल कदम, सुधीर पराडकर व दत्तप्रसाद फोंडेकर यांचे आभार मानले. तसेच अनाथांची सेवा करणारे संविता आश्रमचे संस्थापक संदीप परब व त्यांचे कर्मचारी जान्हवी आंगणे, लीना पारकर, ज्योती आंगणे, केविन डिसोझा, उदय कामत व अक्सर अली यांचेही खूप आभार मानले.