प्रेमजीभाई आसर प्राथमिक विद्यालयात ‘क्षेत्रभेट’ उपक्रम संपन्न…

चिपळूण शहरातील प.ए.सोसायटी संचालित प्रेमजीभाई आसर प्राथमिक शाळेत १७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत परिसर अभ्यास विषयातर्गत ‘क्षेत्रभेट’ हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका मा. श्रीम.संगिता नाईक यांच्या मार्गदर्शनानुसार इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक व विषयशिक्षक यांनी याचे नियोजन केले होते. शाळेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीत परिसरातील अनेक घटक सहकार्य करत असतात असेच उत्तम सहकार्य चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.श्री.प्रसाद शिंगटे साहेब यांनी केले. यावेळी श्री.प्रमोद ठसाळे यांनी नगरपालिकेतील सर्व विभागाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी विशेष नियोजन केले.त्यामुळे पाणीपुरवठा विभाग, करवसुली विभाग, आरोग्य विभाग, नागरी सुविधा केंद्र इ. विभागाची उत्तम माहिती मिळाली. यावेळी नगरपालिकेतील सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभले. यानंतर गेलेल्या चिपळूण मुख्य पोस्टऑफिसच्या क्षेत्रभेटीच्यावेळी पोस्टमास्तर श्री.पानवलकर व
तेथील कर्मचारी श्री.सचिन कदम व श्रीम.अंकिता चांदिवडे यांनी विद्यार्थ्यांना पोस्टात असणाऱ्या सुविधा तसेच प्रत्यक्ष पोस्टाचे कामकाज कसे चालते व्यवहार कसे करावे याची माहिती दिली.
पत्रांचे प्रकार, स्पीड पोस्ट, मनी ऑर्डर, कुरिअर सेवा तसेच सुकन्या योजना, ऑनलाईन व्यवहार कसे चालतात हे प्रत्यक्षदर्शी दाखवले.

चिपळूण पोलिसस्टेशन येथे गेलेल्या
क्षेत्रभेटीच्यावेळी तेथील महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल श्रीम.वैदेही वैभव सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना पोलिस यंत्रणा कशी २४ तास कार्यरत असते हे सांगितले. पोलिस हाताळत असलेली शस्त्रे व त्याचा वापर कधी व कोठे कसा करायचा हे सांगितले. शस्त्र जवळून पाहायला मिळाली म्हणून विद्यार्थी खूपच खुश होते. विद्यार्थ्यांना याठिकाणी बालगुन्हेगारी , वाहतुकीचे नियम, स्वतःची सुरक्षितता याची माहिती देण्यात आली. समाजात वावरताना मुलींबरोबरच मुलांनीही सजग राहून स्वतःची काळजी घेतली पाहिजे यावर विशेष भर दिला.आयुष्यात अशी कोणतीही कृती करू नका ज्यामुळे पोलिसस्टेनला यावे लागेल असा मोलाचा संदेश यावेळी दिला.
यानंतर चिपळूण शहरातील हायवेलगत असलेल्या ॲक्सिस बँकेत गेलेल्या क्षेत्रभेटीच्यावेळी या बँकेचे शाखाधिकारी मा.श्री.नितिन पावसकर साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना समजेल अशा भाषेत बँकेच्या व्यवहाराची माहिती दिली. पैशांचे व्यवहार मशिनद्वारे कसे चालतात हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दाखवले.
A.T.M, ऑनलाईन सेवा, स्पीड बँकीग सेवेबद्दल माहिती दिली. बँकेचे व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी हे सांगितले. वरील सर्व क्षेत्रभेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी मुलाखतीतून माहिती मिळवली.
प्रत्यक्ष विद्यार्थी क्षेत्रभेटीनंतर सर्व संकलित माहिती PPT द्वारे चौथीच्या विद्यार्थ्यांना देण्यात आली.या स्तुत्य उपक्रमाचे शालेय समिती अध्यक्षा वैशाली निमकर यांनी कौतुक केले.