लांजा झापडे कोट रस्त्यावरील बेनी नदीवर पूल होण्याची मागणी
लांजा येथील पत्रकार परिषदेत दिली माहिती
लांजा l प्रतिनिधी : तालुक्यातील झापडे कांटे कोट या गावांना जोडणाऱ्या आणि पंचक्रोशीतील सर्वच गावांना फायदेशीर ठरणाऱ्या बेनी नदीवरील पुलाच्या मागणीसाठी कोट गावचे माजी सरपंच शांताराम तथा आबा सुर्वे हे सहकाऱ्यांसह येत्या १ मे रोजी उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या या मागणीला दशक्रोशीतील ११ गावच्या सरपंचांनी जाहीर पाठिंबा दर्शविलेला आहे. याबाबतची माहिती शांताराम सुर्वे यांनी गुरुवारी १६ मार्च रोजी लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
लांजा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना माजी सरपंच शांताराम सुर्वे यांनी सांगितले की, लांजा तालुक्यातील कांटे आणि कोट या दोन गावांना जोडणारा बेनी नदीवरील पूल होणे अत्यावश्यक बाब बनली आहे. गेली अनेक वर्षे आम्ही ही मागणी सातत्याने करत आहोत . तालुक्याच्या पश्चिम भागातील दहा ते बारा गावांना हा पूल जोडणारा आहे. तसेच सदरचा रस्ता हा इतर जिल्हा मार्ग १५ असून १६ कमी लांबीचा आहे. बेनी नदीवरील पूल झाला तर त्याचा फायदा झापडे कांटे कोटसह भडे, लावगण ,खाणवली ,आगवे ,वाडी लिंबू वाघ्रट, बेनी, हर्चे आदी गावांना होणार आहे.औ तसेच या मार्गे पावस रत्नागिरी हा दळणवळणाचा अतिशय जवळचा मार्ग देखील उपलब्ध होणारा असून त्याचा थेट फायदा दशक्रोशीतील गावांना होणार आहे
सदरचा नियोजित पुलाचा सर्वे व अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दोन ते तीन वेळा यापूर्वी करण्यात आलेले आहे. मात्र तरी देखील अद्यापपर्यंत या पुलाच्या कामाला मंजूरी मिळालेली नाही. आणि म्हणूनच झापडे कांटे कोट दशक्रोशीतील ग्रामस्थांची पुलाबाबत असणारी रास्त मागणी लक्षात घेऊन या या पुलाला तातडीने मंजुरी देण्यात यावी अन्यथा येत्या एक मे रोजी आपण ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसणार आहोत. आपल्या या मागणीला कोट गावासह झापडे, कांटे, कोलधे, जावडे, आगवे, उपळे ,वाघ्रट, खानवली, भडे, हर्चे, पुनस या सरपंचांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
या पत्रकार परिषदेला शांताराम सुर्वे यांच्यासह झापडे- कांटे सरपंच विनया कुष्टे तसेच हर्चे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाई मयेकर व अन्य उपस्थित होते