.. तर ऑफलाईन धान्य पुरवठा करायला लावू : संजू परब

Google search engine
Google search engine

नेटवर्कच्या समस्येमुळे त्रस्त ग्राहकांना दिले आश्वासन

सावंतवाडी । प्रतिनिधी : दिवाळीच्या तोंडावर अंत्योदय व केशरी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा ‘ किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने सर्वसामान्य जनतेची यावर्षीची दिवाळी सरकारने गोड केली. मात्र, ग्रामीण भागासह शहरातही नेटवर्कच्या समस्येमुळे रेशन दुकानातील धान्यपुरवठा ठप्प झाल्याने ग्राहक त्रस्त झाले. शहरातील अशाच एका समस्या उद्भवलेल्या रेशन दुकानात प्रत्यक्ष भेट देऊन संजू परब यांनी ग्राहकांच्या समस्या जाणून घेत त्यांना नेटवर्कची समस्या उद्भवल्यास ऑफलाइन पद्धतीने वितरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.

दिवाळीसाठी भाजपा युती सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी

रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे

कीट उपलब्ध करून दिले. मात्र, या किटच्या वितरणावेळी थंब मशिनला आवश्यक असलेल्या नेटवर्कची समस्या उद्भवल्याने कार्डधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. सकाळपासूनच नेटवर्क समस्या असल्याने ग्राहकांचा खोळंबा झाला. संपूर्ण दिवस ताटकळत राहिल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अखेर ही बाब भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांना समजताच त्यांनी तात्काळ रेशन धान्य दुकानावर धाव घेत ग्राहकांची समस्या जाणून घेत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तहसीलदारांनी ऑफलाईन पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविल्याने परब यांनी अन्न नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क करून या समस्येवर योग्य ते उपाय योजना करू असे आश्वासन देऊन ग्राहकांना देत शांत केले. तसेच उद्या सकाळी नेटवर्कची समस्या उद्भवल्यास सर्व ग्राहकांना ऑफलाईन धान्य पुरवठा करण्यात येईल असेही सांगितले.

Sindhudurg