सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. परिमल नाईक यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माजी अध्यक्ष ॲड.राजेंद्र रावराणे व त्यांच्या कार्यकारणीचे सर्व सदस्य, निवडणूक अधिकारी ॲड.विलास परब यांनी यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ॲड. परिमल नाईक यांच्यासह नूतन कार्यकारीणी उपाध्यक्ष विवेक मांडकुलकर, उपाध्यक्षा ॲड. निलिमा गावडे,
सचिव ॲड. यतिश खानोलकर,
खजिनदार ॲड. गोविंद बांदेकर,
सहसचिव ॲड. अक्षय चिंदरकर यांनीही पदभार स्वीकारला.
यावेळी ॲड. परिमल नाईक यांनी सर्वांचे आभार मानत आगामी काळात सर्वाना सोबत घेऊन काम करणार असून वकिल मित्रांच्या अडिअडचणी दूर करू तसेच नवोदित वकील मित्रांना कसा न्याय देता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. त्याच प्रमाणे सिंधुदुर्ग ओरोस येथे सुसज्ज वकील भवन उभारण्याच्यादृष्टीने व कुडाळ सावंतवाडी मालवण व देवगड न्यायालयाच्या सुसज्ज इमारती उभारण्यासाठी काटकोर प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
यावेळी मावळते अध्यक्ष ॲड. राजेंद्र रावराणे यांनी नूतन कार्यकारणीला शुभेच्छा देऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. नूतन कार्यकारणी पदाधिकारी व सदस्यांनी ही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी अन्या वकील मित्रांनी तसेच मावळत्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांनी नूतन कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तर आभार माजी सचिव ॲड. अमोल मालवणकर यांनी मानले.