पेन्शन साठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांना बाजूला सारून वागदे शाळा सुरू

Google search engine
Google search engine

विनसम क्रीडा मंडळ, व्यवस्थापन समिती व वागदे ग्रामपंचायत चा पुढाकार
 

तालुक्यात हाच पॅटर्न लवकरच सुरू होणार !

कणकवली | प्रतिनिधी : शासकीय कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी वागदे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळा मुलांसाठी आज पासून खुल्या झाल्या. विनसम क्रीडा मंडळ, स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती व वागदे ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने सोमवार पासून या शाळा सुरू झाल्या. टप्याटप्याने गावातील सर्व शाळा सुरू करणार असल्याचे सरपंच संदीप सावंत व विनसम अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी सांगितले.शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी सकाळी ७.३० ते ११ या वेळेत शाळा भरवण्यात आली. ४० पटसंस्था असलेल्या आर्यादुर्गा शाळेत आज २५ मुलांनी उपस्थिती दर्शवली. शाळा पुन्हा एकदा सुरू झाल्याने आनंद होत असल्याचे पालकांनी सांगितले.
सरपंच संदीप सावंत म्हणाले, संपाला आमचा विरोध नाही. परंतु संपाचा फटका विद्यार्थ्यांना बसू नये म्हणून गावातील 2 शाळा सुरू केल्या आहेत. टप्याटप्याने उर्वरित तिन्ही शाळा सुरू करण्याचा मानस आहे. गावातील डीएड झालेल्या महिला मुलांना शैक्षणिक धडे देत आहेत.

जिल्ह्यात प्रत्येकाने असा पुढाकार घेऊन शाळा सुरू कराव्यात असे आवाहन संदीप सावंत व अनिल चव्हाण यांनी केले आहे. यावेळी शालेय व्यवस्थापन अध्यक्ष संजय घाडीगावकर, विनसम सचिव बबलू परब,गिरीश परब, ग्रामस्थ संजना घाडीगावकर,उर्मिला घाडीगावकर,आरती घाडीगावकर, दीपा सावंत, डीएड शिक्षक विनया परब, पूजा चव्हाण, रचना परब, अंगणवाडी सेविका पुष्पांजली कदम, मदतनीस अर्चना तेंडोलकर उपस्थित होत्या. अशा प्रकारे शाळा सुरू होण्याच्या जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.